भारताची दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने BWF सुपर 350 सय्यद मोदी स्पर्धा जिंकली आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने युवा स्टार मालविका बनसोडचा अवघ्या 35 मिनिटांत पराभव केला. सिंधूने 21-13, 21-16 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. माजी विश्वविजेत्या सिंधूचे सय्यद मोदी स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी 2017 मध्येही तिने या BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
यापूर्वी मालविकाने तीन गेमपर्यंत चाललेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अनुपमा उपाध्यायचा 19-21, 21-19, 21-7 असा पराभव केला होता. दुसरीकडे, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूची लढत पाचवी मानांकित रशियन प्रतिस्पर्धी इव्हजेनिया कोसेत्स्काया हिच्यासोबत होती. मात्र इव्हजेनियाला उपांत्य फेरीत दुखापत झाली होती.
इशान भटनागर आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीने रविवारी भारतीय जोडी टी. हेमा नागेंद्र बाबू आणि श्रीवेद्या गुराझादा यांचा सरळ सेटमध्ये पराभव करून सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. इशान आणि तनिषाने अवघ्या 29 मिनिटांत बिगरमानांकित भारतीय जोडीविरुद्ध 21-16, 21-12 असा विजय नोंदवला.