सतत मोबाईलवर गेम खेळत असल्याच्या रागातून बापाच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

5 वर्षाचा मुलगा सातत्याने मोबाईलवर गेम खेळत असल्याच्या रागातून संतापलेल्या बापाने मुलाला बेदम मारहाण केली. त्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

दक्षिण दिल्लीतील नेब सराई येथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील एका नागरिकाने आपल्या 5 वर्षांच्या मुलाला मोबाईलवर गेम खेळताना पाहिले. मुलगा अभ्यासाकडे दुर्लक्ष करून सातत्याने मोबाईलवर गेम खेळत आहे. त्याची समजूत काढूनही त्याच्या हातातील मोबाईल खाली ठेवला जात नाही. या रागातून आरोपीने आपल्या 5 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नारायणा अपार्टमेंटमध्ये राहणारा 5 वर्षांचा चिमकुला ज्ञान पांडे उर्फ ​​उत्कर्ष याला मॅक्स हॉस्पिटल साकेतमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हॉस्पिटलने या घटनेची माहिती गुरुवारी नेब सराई पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि वैद्यकीय अहवाल मागवला. त्यावेळी मुलाच्या आईने रात्री 10 वाजता मुलाला बेशुद्ध अवस्थेत इमर्जंसी वॉर्डमध्ये आणले होते. मुलाच्या मानेच्या उजव्या बाजूला, दोन्ही हात आणि पाय तसेच शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुखापतींबाबत मुलाच्या पालकांना विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यांनी घटनेची वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीने चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. उत्कर्षच्या वडिलांनी त्याला मारहाण केली आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी उत्कर्षला त्याच्या वडिलांनी बेदम मारहाण केल्याचे पोलिसांना समजले. आरोपी आदित्य पांडे (२७) याच्या चौकशीदरम्यान त्याने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्सच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.