उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर
गोव्याच्या निवडणुका 7 टप्प्यात
गेल्या दोन महिन्यांपासून ज्या निवडणुकांची देशभर चर्चा सुरू होती, त्यासाठी अखेर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. पाचही राज्यात एकूण 690 विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकूण 7 टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर पाचही राज्यात 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधासह आणि खबरदारी घेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
बूस्टर डोससाठी नव्याने
नोंदणीची आवश्यकता नाही
केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार, देशभरात आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. शुक्रवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की पात्र लोक ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहेत, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात.
मुंबई शहरात 300 पेक्षा
जास्त इमारती सिल
राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. संक्रमण झपाट्याने वाढत आहे. राजकीय नेते, मंत्री कोरोनाने बाधित झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही चार पट कोरोनाची रुग्णसंख्या वाढला आहे. दरम्यान, मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सिल करण्यात आल्या आहेत. 20 टक्के पेक्षा जास्त लोक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दादर आणि दादर पार्क येथील भागात कंटन्मेंट झोन करण्यात आला आहे. माहिम आणि धारावी येथेही मोठ्या प्रणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत 300 पेक्षा जास्त इमारती सील करण्यात आल्या आहेत.
ड्रॅगन फ्रूट्समध्ये करोना
विषाणूचे अंश आढळले
व्हिएतनाममधून आयात करण्यात आलेल्या ड्रॅगन फ्रूट्समध्ये करोना विषाणूचे अंश आढळल्यानंतर चिनी अधिकाऱ्यांनी अनेक सुपरमार्केट बंद केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या झेजियांग आणि जिआंगशी प्रांतातील किमान नऊ शहरांमध्ये व्हिएतनाममधून आयात केलेल्या ड्रॅगन फ्रूटमध्ये करोना विषाणूचे नमुने सापडले आहेत. पुढे, अधिकाऱ्यांनी आयात केलेल्या अन्न उत्पादनांची आपत्कालीन तपासणी सुरू केली आहे. अन्नातून कोविड-१९ पसरल्याचा वैज्ञानिक पुरावा नसतानाही खरेदीदारांना विलगीकरणात राहण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार गिरीश महाजन
यांना कोरोना संसर्ग
आमदार गिरीश महाजन हे गेल्या दोन दिवसांपासून विविध विकास कामांच्या बाबत मतदारसंघात दौरे करत आहेत. त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. याबाबत तयारी देखील करण्यात आलेली होती. मात्र शनिवारी सकाळी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल आला आहे. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी तातडीने स्वतःला कोरोंटाईन करून घेतले आहे. याबाबत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्याशी चर्चा करून कोरोना महामारीच्या आजारातून बरे होण्यासाठी विविध टिप्स जाणून घेतल्या.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या
कुटुंबातील काही जणांना करोनाची लागण
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या कुटुंबातील काही जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी, मुलगी आणि सूनेला करोना झाला असून मुख्यमंत्री चन्नी यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मोहालीचे सिव्हिल सर्जन आदर्शपाल कौर यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांच्या पत्नी डॉ. कमलजीत कौर, त्यांचा मुलगा नवजीत सिंग आणि सून सिमरनधीर कौर यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
तालुका पातळीवर पक्षी अधिवास
उपचार केंद्रे उघडावीत
महाराष्ट्रातील पक्षीवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज आहे. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांमुळे अलीकडे पक्षी घायाळ होण्याचे प्रमाण वाढले असून त्यासाठी तालुका पातळीवर पक्षी अधिवास उपचार केंद्रे उघडावीत. पक्षिमित्रांना ओळखपत्रे द्यावीत, अशा सूचना ३४ व्या महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. निनाद शहा यांनी केल्या. सोलापुरात डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सुरू झालेल्या राज्य पक्षिमित्र संमेलनात अध्यक्षपदावरून प्रा. डॉ. शहा बोलत होते.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात
7 विषयांना शासनस्तरावर मान्यता
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी एकूण 7 विषयांना शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांची निवड करून या अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. तब्बल 670 कोटी रुपयांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
बीड शहरात जुगार अड्ड्यावर
धाड, काही शिक्षकांना अटक
बीड शहरात पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. येथे ज्या 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातील काही लोक शिक्षक असल्याचे आढळून आले. शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्यार्थ्यांना आदर्शाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनीच अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जोर धरत होती. अखेर बीड जिल्हा परिषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी पाच शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले.
रावसाहेब दानवे यांना कोरोना संसर्ग
राज्यातील बड्या नेत्यांना कोरोना संसर्ग होण्याची मालिका सुरुच आहे. राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. स्वत: ला आयसोलेशन करुन घेतलं असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तर, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी साहेब लवकर बर व्हा, असं म्हटलंय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देखील दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.
SD social media
9850 60 35 90