आज दि.२४ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

४ ऑक्टोबरपासून
राज्यातील शाळा सुरू होणार

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली आहे. करोना नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर, शाळा सुरू कधी होणार? याबाबतची प्रतीक्षा आता संपलेली आहे.

पुढील वर्षभरामध्ये करोनाची
साथ पूर्णपणे संपेल : स्टीफन बैेसेल

करोनाची लस निर्मिती करणाऱ्या मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बैेसेल यांनी करोनाची साथ कधी संपणार आहे, यासंदर्भात मत मांडलं आहे. स्टीफन यांनी करोना लसीकरणाच्या संदर्भात दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लवकरच करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येणार असल्याचं मत व्यक्त केलंय. स्टीफन यांच्या मते पुढील वर्षभरामध्ये करोनाची साथ पूर्णपणे संपेल. जागतिक मागणीनुसार आज जगभरातील अनेक देशांमध्ये करोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन घेतलं जात आहे. त्यामुळेच लवकरच करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येईल असं स्टीफन म्हणाले आहेत.

लष्कराला अर्जुन रणगाड्याची
नवी आवृत्ती मिळणार

भारताच्या लष्कराला स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती मिळणार आहे. संरक्षण दलाने ११८ ‘अर्जुन एमके-१ ए’ रणगाड्यांची ऑर्डर चेन्नई स्थित आयुध निर्माण कारखान्याच्या ‘हेवी व्हेहिकल फॅक्टरी’ला दिली आहे. यामुळे पुढील काही महिन्यांत संरक्षण दलात अत्याधुनिक अर्जुन एमके-१ ए रणगाडे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ११८ रणगाड्यांची किंमत ७ हजार ५२३ कोटी रुपये आहे.

पंजाब काँग्रेसचे मतभेद तीव्र, तर
अपमानाला स्थान असेल का : अमरिंदर सिंग

पंजाब काँग्रेसमधील मतभेद शांत करण्याच्या प्रयत्नात असताना आता पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्वच वादात सापडलं आहे. त्यामुळे, आता काँग्रेसमध्ये ‘राग आणि अपमान’ यावर युद्ध सुरू झालं आहे. राजकारण आणि राग यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने दिलेल्या प्रतिक्रियेवरून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस हायकमांडवर प्रहार केला आहे. “जर राजकारणात रागाला स्थान नसेल तर मग अपमानाला आहे का? असा सवाल अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेतृत्वाला विचारला आहे. त्यामुळे, काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

भारतात अफगाणी दहशतवादी
घुसले, मोठ्या हल्ल्याची शक्यता

अफगाणिस्तानात सत्तेवर तालिबान आल्यानंतर आता भारतात अफगाणी दहशतवादी घुसल्याची बातमी समोर आली आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांनी याबाबत सरकारला अलर्ट जारी केला आहे. या संस्थांच्या माहितीनुसार, भारतात कुठल्यातरी मोठ्या हल्ल्याची शक्यता आहे. मिलिट्री कॅम्प, मोठी सरकारी कार्यालयं यांना धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या अफगाणी दहशतवाद्यांना भारतात आणलं, ते पुन्हा पाकिस्तानात शिरताना भारतीय सैन्यासोबत त्यांची झडप झाली.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणतात,
चौकात खून झाले तरच कायद्याचा प्रश्न..!

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दबंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना चार दिवसांमध्ये घडलेल्या सहा खुनाच्या घटनांचे गांभीर्य नसल्याचं पाहायला मिळत आहे. खुनाच्या घटना वाढल्या नाहीत, त्या कमीच आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच, जोपर्यंत भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होत नाही. या सामाजिक घटना नाहीत असं विधान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे.

दिल्लीच्या कोर्टात गॅंगस्टरची
गोळ्या घालून हत्या

दिल्लीतला मोस्ट वाण्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या करण्यात आली. रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शूटआऊट करत हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काऊंटर करण्यात आला. हल्ला करणारे विरोधी गटातील होते असं सांगितलं जात आहे. शूटआऊटमध्ये एकूण चौघे ठार झाले आहेत.

एलपीजी सिलिंडर पुन्हा
महागण्याची शक्यता

केंद्र सरकार एलपीजीला मिळणारी सबसिडी बंद करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात अधिकृतरीत्या आदेश काढलेला नसला तरी सरकारच्या आंतरिक मूल्यांकनात ग्राहक एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये खर्च करण्यास सक्षम असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीसंदर्भात सरकारमध्ये दोन विचार आहेत. पहिल्या योजनेत आहे तसे चालू द्यायचे आणि दुसऱ्यात उज्ज्वला योजनेनुसार आर्थिकदृष्टय़ा कमजोर वर्गालाच सबसिडी द्यायचा विचार आहे. अर्थात सबसिडी देण्यासंदर्भात अजूनही स्पष्टता करण्यात आलेली नाही.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.