राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या मालमत्तांवरही आयकर विभागने धाडी मारल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. केवळ अजित पवारांच्या नातलग म्हणून धाडी टाकल्या असतील तर ते योग्य नाही, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील चार साखर कारखान्यांवर आयकर विभागाने आज पहाटे धाड टाकली. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे, ज्यांची 35-40 वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं, असं अजित पवार म्हणाले.
माझ्या कंपन्यांवर धाड टाकली याचं मला काही नाही, पण नातेवाईकांवर धाड कशी? त्यांचा संबंध नसताना धाड टाकली याचं मला वाईट वाटलं. इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण मला पटलेलं नाही. सरकार येत असतं जात असतं, पण जनता सर्वस्व आहे. जनता योग्य तो निर्णय घेत असते, असं सांगतानाच मागे निवडणुकीच्या काळात, पवारसाहेबांचा एका बँकेशी काहीचा संबंध नसताना नोटीस आली, त्यावेळी राजकारण सर्वांनी पाहिलं, असं ते म्हणाले.
आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे