राज्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईतही शाळा कधी सुरू होणार असा सवाल केला जात आहे. मात्र, मुंबईतील शाळाही आता लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात चर्चा झाली असून शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युलाही ठरला आहे. खुद्द वर्षा गायकवाड यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी बोलताना शाळा सुरू होण्याबाबतची माहिती दिली. मुंबईतील पालिकेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे. माझी महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. शाळा सुरू करण्याबाबत ते सकारात्मक आहेत, असं गायकवाड यांनी सांगितलं.
मुंबईतील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांचं सॅनिटाईजेशन करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत 76 टक्के शिक्षकांचं लसीकरण झालं असून सर्वच शिक्षकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एसओपीचं पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली आहे, असं त्या म्हणाल्या.
विरोधकांकडून पुन्हा सत्तेत येणार असल्याची विधानं केली जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमचं सरकार बनलं तेव्हा विरोधकांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळण्याची भविष्यवाणी केली होती. पण सरकार अजूनही स्थिर आहे. सरकारला कसलाही धोका नाही, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला.
दरम्यान, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनीही यावेळी मीडियाशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आम्ही दोन पावलं पुढे गेलो आहोत. ऑक्टोबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर निवडणूक तयारीला अधिक गती मिळेल, असं भाई जगताप म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचं सूचक विधान राहुल गांधी यांनी एक महिन्यापूर्वीच केलं होतं. त्यानुसार आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. सर्वच्या सर्व 227 जागा आम्ही लढणार आहोत, असं जगताप म्हणाले.