राज्यात उन्हाच्या तीव्र झळा कायम आहेत. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. तर दुसरीकडेर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस झाला आहे. त्यामुळे थोडासा येथे दिलासा मिळाला आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात तापमान वाढ आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. उत्तरेकडील राज्यात अजूनही उष्णतेची तीव्र लाट आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात तापमान वाढ थांबण्याची चिन्हं नाहीत. मात्र दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे.
विदर्भात सर्वत्र कमाल तापमान 41 अंशांच्या पुढे आहे. तर राज्यात अकोल्यात सर्वोच्च म्हणजे 43.9 अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही पारा चाळीशी पार आहे. राज्यामध्ये सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसल्या असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तीव्र उन्हामुळे विविध आजार होण्याची शक्यता वाढलेली असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. रस्त्या निर्मनुष्य होत आहे. तर दुसरीकडे शीतपेये यांना मागणी देखील वाढलेली आहे.
उन्हात काम करत असताना नागरिकांनी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे तसेच डोक्यावर रुमाल बांधण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने सूचना केलेली आहे.