आधी मार्गारेट अल्वांना पाठिंबा, प्रत्यक्ष मतदानावेळी वेगळंच चित्र, शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय?

शिवसेनेत सध्या नेमकं काय चाललंय? हा प्रश्न सर्वसामान्यांना वारंवार सतावतोय. कारण शिवसेनेच्या गोटातल्या घडामोडीच अगदी तशा घडत आहेत. गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत स्वत:च्या पक्षात मोठं खिंडार पाडलं. त्यांना शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर अनेक खासदारही त्यांच्या गटात सहभागी झाले. या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या अग्रहाखातर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला होता. मुर्म निवडूनही आल्या. त्यानंतर बरेच खासदार शिंदे गटात सहभागी झाले. पण काही खासदार ठाकरेंसोबत होते. ठाकरे गटाच्या खासदारांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवला होता. पण प्रत्यक्ष मतदानावेळी वेगळंच चित्र बघायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेत नेमकं काय सुरुय? अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरु झाली आहे.

देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी काल निवडणूक पार पडली. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आणि एनडीएचे जगदीप धनखड यांच्यात लढत झाली. पण या लढतीत भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेत सर्वाधिक जागा असल्याने जगदीप धनखड यांचा विजय निश्चित मानला जात होता. या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवला होता. पण प्रत्यक्षात मतदान करताना शिवसेनेची उदासीनता दिसली. ठाकरेंच्या गटातील तब्बल सहा खासदारांनी काल उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानच केलं नाही, असं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.

शिवसेनेच्या लोकसभेतील सहा खासदारांपैकी पाच खासदारांनी वेगवेगळ्या कारणास्तव मतदान केलेलं नाही. यामध्ये विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर, संजय जाधव, राजन विचारे यांनी या निवडणुकीत मतदान केलं नाही, अशी माहिती समोर आली आहे. तर राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असल्याने ते सुद्धा मतदान करु शकलेले नाहीए.

उपराष्ट्रपतीपदाच्या काल निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केलं. यापैकी तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण 36 खासदारांनी तटस्थ राहण्याचं ठरवलेलं होतं. त्यामुळे ते मतदान करणार नाहीत हे आधीच ठरलं होतं. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील खासदारांनी मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवला होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत वेगळंच चित्र दिसलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.