महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव जवळ असल्याने मंदिर प्रशासनासह नगर परिषद व पोलीस विभागाची तयारी जोरात सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या राजे शहाजी महाराज व जिजाऊ महाद्वार यासह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ आणि ‘आई राजा उदो उदो’ असे विविध आकर्षक रोषणाईने लिहले आहे. तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असून ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी आणि पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. मंदिर समोरील भाग हा सध्या सेल्फी पॉईंट ठरत आहे.
पुणे येथील श्री देविभक्त उंडाळे व टोळगे बंधुची श्री तुळजाभवानी मातेवर अपार श्रद्धा असल्याने गेल्या 7 वर्षांपासून ही मंडळी मंदीर परिसरात आकर्षक रोषणाई सेवा म्हणून देवीच्या चरणी अर्पण करतात. ही सेवा ते कोणताही आर्थिक मोबदला तुळजाभवानी मंदीर संस्थान कडून न घेता करत आहेत. तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवातील ही विद्युत रोषणाई आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार आहे. तुळजाभवानी देवी ही भक्तांची आई असल्याने देवीला ‘आई साहेब’ असे आदराने व भक्तीने भाविक हाक मारतात तर देवीची पूजा करण्यापूर्वी व कोणतेही शुभ काम करताना ‘ आई राजा उदो उदो’ असा जागर भाविक करीत असतात. त्यामुळे याची रोषणाई करण्यात आली आहे.
पुणे येथील विजय उंडाळे, नितीन उंडाळे, संजय टोळगे आणि सोमनाथ टोळगे हे देविभक्त 2014 पासून श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात संपूर्ण मंदीरावर आकर्षक अशी विद्युत रुषणाई रुपी सेवा करीत आहेत. विजय उंडाळे यांनी 2013 साली श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानला चांदीची उत्सवमुर्ती अर्पण केली होती. यंदा लाईटइफेक्ट असणारी विद्युत रोषणाई अर्पन करण्यात आली. त्याचबरोबर देवीच्या गाभाऱ्यात गाभारा गरम न होणारी पावरफुल्ल लाईट बसविण्यात येणार आहे. तर निंबाळकर दरवाजा, कुंडावर आणि परिसरात रोषणाई केली जाणार आहे, अशी माहिती पूजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी दिली.
कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली मंदिरे सुरू होणार असल्याने भाविक, पूजारी आणि व्यापारी आनंदी आहेत. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीसह अन्य मंदिरे नवरात्रच्या पहिल्या दिवसापासून सूरु होणार असल्याने गर्दी वाढत आहे. तर देवीच्या दर्शनाची भाविकांना आतापासूनच ओढ लागली आहे. मंदिर रोषणाई कॅमेरात टिपण्यासाठी भाविक येत आहेत.
जुनी विद्युत रोषणाई साहित्य मोफत मंडळाना भेट
गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी नवीन विद्युत रोषणाई केली जाते. जुनी विद्युत रोषणाई साहित्य उंडाळे-टोळगे हे गावी न नेता सार्वजनिक देविमंडळे मंदीर यांना मोफत देतात. त्यांनी विद्युत रोषणाई आजपर्यंत कर्नाटकातील विजापूर,अहमदनगर, लातूर, बार्शी, उदगीर येथील मंडळाना दिली आहे.
तुळजाभवानी देवीचे मंदिर वर्षानंतर खुले होणार असल्याने आणि त्यातच देवीचा मुख्य नवरात्र उत्सव असल्याने भाविक लाखोंच्या संख्यने तुळजापूरात येणार आहेत.