केंद्र सरकारने तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. त्या अनुशंगाने दिल्ली येथे तर बंदोबस्त वाढविण्यात आला आहेच शिवाय राज्यातील शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. कॅांग्रेस पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा दिला असून स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
केंद्र सरकारने पारीत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याच्या विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी ‘भारत बंद’ची घोषणा केली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
तर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे, दिल्ली सरकारने भारत बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत सोमवारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
तसेच दिल्ली शहराच्या सीमेवर तीन ठिकाणी आंदोलन करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, दिल्लीत भारत बंदची हाक नाही, पण आम्ही सध्याच्या घडामोडी पाहता, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आम्ही सुरक्षा दले तैनात केले आहेत.
लोकशाही आणि संघराज्य तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय पक्षांनी देखील भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने सांगितलं की, सोमवारी (27 सप्टेंबर) सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे.