हिरा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमध्ये सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कडोदराच्या वरेलीमध्ये एका पॅकेजिंग युनिटला लागलेल्या भीषण आगीत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या आगीतून आता 125 जणांची सुटका करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मजुरांनी उड्या मारल्या. त्यात अनेक मजूर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
कडोदरामधील वरेली येथील एका पॅकेजिंग युनिटच्या पाचव्या मजल्यावर ही भीषण आग लागली. पाचव्या मजल्यावर काम सुरू असताना अचानक आग लागल्याने कामगार भयभीत झाले. काही मजुरांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांना हायड्रोलिक लिफ्टने खाली उतरवले. या आगीतून अनेकांना रेस्क्यू करण्यात आलं. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या एक डझनहून अधिक गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे.
फॅक्ट्रीत आग लागल्यानंतर मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक आग आणि धुराचे लोट पसरल्याने फॅक्ट्रीबाहेर पडण्यासाठी मजुरांची धावपळ उडाली. सर्वचजण सैरावैरा पळू लागले. मात्र, जिन्यातही आगीचे लोट आल्याने त्यांना बाहेर पडणं मुष्किल झाल. त्यामुळे काही मजुरांनी थेट इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उड्या मारल्या. त्यात अनेकजण जखमी झाले. आगी आणि धुरामुळे अनेक मजुरांना गुदमरल्यासारखे झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला.