केरळमध्ये निसर्गान थैमान घातलं आहे, इथं मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा भूस्खलनाच्या घटना सुरु झाल्या आहेत. केरळमधील कोट्यायमचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर कुणाचाही थरकाप उडेल. इथल्या मुंडकायममध्ये मुसळधार पावसामुळे एक घर वाहून गेलं. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान 24 जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारपर्यंत पाऊस थांबला होता, पण तरीही प्रशासनाने भूस्खलनाच्या धोक्यावर बारीक नजर ठेवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. गंभीर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीला सामोरे मदत देऊ केली आहे.
कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यातील डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक पूर आला आणि त्यातच झालेल्या भूस्खलनामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इडुक्कीच्या जिल्हा दंडाधिकारी शीबा जॉर्ज यांनी सांगितले की खराब हवामानामुळे इडुक्कीच्या डोंगराळ भागात प्रवासावर बंदी आहे. “आतापर्यंत नऊ मृतदेह सापडले आहेत. दोन लोक बेपत्ता आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली.
पीएम मोदी म्हणाले, “मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.” त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले, ‘केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांचा मृत्यू झाला हे दुःखद आहे. माझ्या भावना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, केरळमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित लोकांना केंद्र सर्वतोपरी मदत करेल. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, “मुसळधार पाऊस आणि पूर पाहता सरकार केरळच्या काही भागातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे”.
शाह म्हणाले की, “केंद्र सरकार गरजू लोकांना शक्य ती सर्व मदत करेल. बचाव कार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफची टीम आधीच पाठवण्यात आली आहे. मी सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो. “राज्याचे महसूल मंत्री के. राजन म्हणाले की, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल. बचाव कार्यादरम्यान तीन मुलांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितले.