शिवसेनेमधल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भानगडीमध्ये बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली, असं खडसे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे आपला मित्रपक्ष मजबूत असला, तर आपणसुद्धा मजबूत असू शकतो. महाविकासआघाडीमधला घटक मजबूत असला पाहिजे, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
तीन पक्ष मिळून सरकार येऊ शकतं, हे शरद पवार यांनी दाखवून दिलं. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्या, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
2019 मध्ये राष्ट्रवादीचे 54 आमदार होते, तर शिवसेनेचे 56 आमदार होते. राष्ट्रवादीचे एक-दोन आमदार जास्त असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता. दोन-तीन आमदारांमुळे किती फरक पडू शकतो, हे आपण पाहिलं. राष्ट्रवादी मजबूत करून पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असं एकनाथ खडसे कार्यकर्त्यांना म्हणाले.
2019 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. या निवडणुकीत भाजपने 105, शिवसेनेने 56, राष्ट्रवादीने 54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. भाजप आणि शिवसेनेने युतीमध्ये निवडणुका लढून त्यांना बहुमत मिळालं होतं, पण मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले, यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी महाविकासआघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकासआघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं.