स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. लता मंगेशकर यांना कोरोना झाल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनावर त्यांनी मात केली; मात्र अखेर रविवारी लतादीदींची प्राणज्योत मालवली. त्यांचं निधन मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच शरीरातले अनेक अवयव निकामी झाल्यामुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार, आयसीयूमध्ये बहुतेक रुग्णांचा मृत्यू मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे होतो. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं की, ‘कोविड झाल्यावर त्यांच्यावर 28 दिवस उपचार सुरू होते. अखेर अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय, ते का होतं आणि कोणाला याचा धोका सर्वांत जास्त आहे, या गोष्टी समजून घेऊ या.
जेव्हा शरीरातले दोन किंवा अधिक अवयव एकाच वेळी काम करणं थांबवतात, त्या स्थितीला मल्टिपल ऑर्गन फेल्युअर किंवा मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम (MODS) म्हणतात. अशा परिस्थितीत, शरीराच्या अनेक भागांसह रोगांपासून संरक्षण करणाऱ्या इम्युनिटी सिस्टीमवर विपरीत परिणाम होतो. परिणामी रुग्णाची परिस्थिती जास्त गंभीर होते.
एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार, मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमध्ये हिमॅटोलॉजिक, इम्युन, कार्डियोव्हॅस्क्युलर, रेस्पिरेटरी आणि एंडोक्राइन सिस्टीमवर थेट परिणाम होतो. थोडक्यात शरीराच्या सर्वच महत्त्वाच्या यंत्रणांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे रुग्णाला एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. परिणामी रुग्णाची परिस्थिती गंभीर होते. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की रुग्णाच्या अंतर्गत अवयवांवर किती प्रमाणात परिणाम झाला आहे, त्यानुसार त्याची लक्षणं सर्व रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतात.
दिवसभर लघवी होत नसेल, सहज श्वास घेता येत नसेल, स्नायूंमध्ये प्रचंड वेदना जाणवत असतील किंवा शरीर थरथर कापत असेल तर ही गंभीर लक्षणं आहेत. अशा वेळी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. या स्थितीत हृदय, फुफ्फुस, किडनी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या अवयवांवर थेट परिणाम होतो, असं एनसीबीआयच्या अहवालात म्हटलं आहे.
मल्टिपल ऑर्गन फेल्युअरचा धोका सर्वांत जास्त दोन प्रकारच्या रुग्णांना असतो. ज्या रुग्णांमध्ये इम्युनिटी लेव्हल कमी आहे त्यांना आणि दुसरा ज्यांना कोणत्याही प्रकारची अंतर्गत दुखापत असेल, अशा व्यक्तींना हे होण्याचा धोका जास्त असतो.
तज्ज्ञांच्या मते, अशा रुग्णांची वेळोवेळी तपासणी करून त्यांना काही विशेष खबरदारी घेण्यास सांगितलं जातं. रुग्ण आधीच एखाद्या आजाराशी झुंज देत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाला जर एकापेक्षा जास्त आजार असतील तर त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जातात.