नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात शिवसैनिकांकडून ‘भावी मुख्यमंत्री’ अशा उल्लेखाचं लावण्यात आलेल्या बॅनरवरील भावी मुख्यमंत्री हे शब्द पुसण्यात आले आहेत. शिंदेंवरील प्रेमापोटी आपण हा बॅनर लावला होता. या बॅनरबद्दल विरोधक उलट्या-सुटल्या चर्चा करत असल्यामुळे भावी मुख्यमंत्री हे नाव पुसण्यात आले, असं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आम्ही शिस्तबद्ध शिवसैनिक असून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असलेल्या भावनेमुळे बॅनर लावण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर भावी मुख्यमंत्री असा केलेला उल्लेख हा पुसण्यात आला आहे”, असं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर लावले होते. येत्या 9 फेब्रुवारी रोजी मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर श्रीकांत शिंदे यांचा 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवस झाला. दोघा पिता-पुत्रांना बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला. पण या उल्लेखामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना अशाप्रकारची बॅनरबाजी होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे अखेर एकनाथ शिंदे यांनी या बॅनरची गांभीर्याने दखल घेत त्यावरील भावी उल्लेख पुसण्याचे आदेश दिले.
भविष्यात खरंच काही राजकीय घडामोडी घडणार?
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळातही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कायम ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाण्यात लावण्यात आलेले हे बॅनर फक्त शुभेच्छांसाठी आहेत की भविष्यातील काही वेगळी घडामोड घडण्याची शक्यता आहे? असे प्रश्न आता उपस्थित केले गेले आहेत.