मागील अनेक दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली असून कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे काळजी घेण्याचे आवाहन केले जात असले तरी रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील अनेक मंत्री तसेच आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. आता कोरोनासंसर्ग केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाले आहे. याबाबतची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या गडकरी यांची प्रकृती उत्तम असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच सध्य ते गृहविलगीकरणात आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली होती. आता केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झालेली आहे. याविषयीची माहिती त्यांनी 11 जानेवारी रोजी रात्री आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली. त्यांना मागील काही दिवसांवासून कोरोना सदृश लक्षणे जाणवत होती. कोरोनाची चाचणी केल्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र तसेच मुंबईतील कोरोना संसर्गाबाबत आढावा वैठक घेतली होती.