गाण कोकीळा लता मंगेशकर यांना
कोरोना विषाणूची लागण
सुप्रसिद्ध गायिका आणि भारताची गाण कोकीळा लता मंगेशकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली, यामुळे त्यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 92 वर्षीय गायीका लता मंगेशकर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती लता मंगेशकर यांची भाची रचनाने दिली. तिने सांगितले की, त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. लता मंगेशकर यांचे वय आणि इतर आरोग्य समस्या पाहता, डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. ज्यामुळे त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले आहे. अशी सूत्रांची माहिती आहे.
आयपीएल २०२२ चे मुख्य
प्रायोजकत्व टाटा ग्रुप कडे
आयपीएल २०२२ मध्ये मोठे बदल होणार आहेत. टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लीग सोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक आहेत, परंतु या काळात टाटा मुख्य प्रायोजक राहील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोने २०१८ मध्ये वार्षिक ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला.
गिरीश महाजन यांच्या विरोधात
एक टेम्पो भरुन कागदपत्र जप्त
भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण तसेच मोठे आहे. गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरुन कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. या कागद पत्रात नेमके काय दडले आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु या कारवाईने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जळगाव येथे गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरुन कागदपत्र जप्त करण्यात आली.
उत्तर प्रदेश सरकारचे
ज्येष्ठ मंत्री समाजवादी पक्षात
१० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशात ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पक्षाकडून पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या घोषणा करण्यात आल्या असतानाच ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपाला मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात असलेले ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. खुद्द सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यासंदर्भात ट्वीटरवर माहिती दिली आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे मुळात २०१६ मध्ये बहुजन समाज पक्षातून भाजपामध्ये आले होते.
अठरा महिन्यांच्या लेकीसोबत
कळसुबाई शिखर केले सर
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे अनेक मावळे आणि हिरकणी आजही या मातीत आहेत. सोलापूरच्या श्रुती गांधीने आपल्या १८ महिन्यांच्या लेकीसोबत राज्यातील सर्वोच्च शिखर सर करत हे दाखवून दिलं आहे. फक्त १८ महिन्याच्या उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुरडीने आपल्या आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केलं आहे. अवघ्या साडेतीन तासात उर्वी आणि तिची आई श्रुती यांनी कळसूबाईचा अवघड शिखर सर करत जबरदस्त कामगिरी केली.
व्होडाफोन आयडियामध्ये
केंद्र सरकारची भागीदारी
व्होडाफोन आयडियामध्ये आता केंद्र सरकारची मोठी भागीदारी असणार आहे. या निर्यणानंतर कर आणि इतर स्वरुपाच्या थकबाकीला भागीदारीमध्ये रुपांतरीत करण्याच्या निर्णयाला व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाने मान्यता दिली आहे. यामुळे प्रवर्तकासह कंपनीच्या सर्व विद्यमान भागधारकांना त्यांचे स्टेक कमी करावे लागतील. रूपांतरणानंतर, भारत सरकारकडे कंपनीच्या एकूण थकबाकीपैकी सुमारे ३५.८ टक्के शेअर्स असतील. व्होडाफोन समूह सुमारे २८.५ आणि आदित्य बिर्ला समूह सुमारे १७.८ टक्के शेअर्स असणार आहेत.
आमदार रत्नाकर गुट्टे यांची
255 कोटींची मालमत्ता ईडीच्या ताब्यात
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे अडचणीत आले आहेत. ईडीने राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेण्यात आलेली ही मालमत्ता डिसेंबर २०२० मध्ये गुट्टे यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने जप्त केली होती. ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे २५५ कोटी रुपये आहे. गुट्टे यांच्यावर ईडीने ६३५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची फसवणूक केली होती
पतसंस्था स्थैर्यनिधीसाठी
अण्णा हजारे यांनी पुढाकार घ्यावा
जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी संघामार्फत जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण दिले जाते. राज्यातील पतसंस्थांच्या ठेवींनाही संरक्षण मिळावे यासाठी पतसंस्था स्थैर्यनिधी संघाची संकल्पना सरकारने पूर्ण राज्यात राबवण्याचा प्रस्ताव सहकार खात्याकडे दिला. मात्र अद्याप शासनाने तो मंजूर केलेला नाही. त्यामुळे हा उपक्रम राज्यात राबवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केली.
वारंवार अर्ज करूनही कर्ज
नाकारले, व्यक्तीने बँक पेटवली
वारंवार अर्ज करुनही काहीतरी त्रुटी निघत होती. त्यामुळे नाराज झालेल्या व्यक्तीने बँकच पेटवून दिली. बँक पेटविणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे ही व्यक्ती नाराज झाली होती. रविवारी हावेरी जिल्ह्यातील बँकेला त्याने आग लावली. बँकेला आग लावणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. कागिनेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे.
आयसीआयसीआय बँक
सर्व सेवांचे शुल्क वाढवणार
आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank)आपल्या क्रेडिट कार्डच्या संबंधित सर्व सेवांचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या वतीने ग्राहकांना एक एसएमएस पाठवण्यात आला आहे. बँकेने म्हटले आहे की, दहा फेब्रुवारीपासून सुधारित दर लागू होतील. नव्या दरानुसार बँकेच्या सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डवर 2.50 टक्के ट्रांझेक्शन फी आकारली जाईल. ही फी कमीत कमी 500 रुपयांपर्यंत असू शकते. ऑटो डेबिट फेल झाल्यास किंवा चेक बाऊंस झाल्यास देखील संबंधित ग्राहकांकडून दोन टक्के दंड वसूल करण्यात येईल.
आत्मनिर्भर भारत रोजगार
योजना नोंदणीला मुदतवाढ
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना अंतर्गत नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणीची सुधारित अंतिम मुदत 31 मार्च पर्यंत असणार आहे. ईपीएफओने यापूर्वीच मुदतवाढीचा निर्णय घेतला होता. ट्विटद्वारे याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. योजनेअंतर्गत तब्बल 40 लाख व्यक्तींना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. कर्मचारी भविष्य निधी संघटना सह नोंदणीकृत आस्थापनांत नवीन कर्मचाऱ्यांना सहभागी करण्याच्या हेतूने अनुदान प्रदान केले जाते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा
31 मार्च पर्यंत हप्ता मिळवता येणार
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता (Farmer) शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा करुन 10 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. त्यानुसार आतापर्यंत देशभरातील 10 कोटी 50 लाख 72 हजार 528 शेतकऱ्यांच्या खत्यावर 2 हजाराप्रमाणे पैसे जमा झाले आहेत. शेतकऱ्यांचे रेकॉर्ड चांगले असेल आणि इतर शेतकरीही योजनेसाठी पात्र 65 लाखहून अधिक शेतकऱ्यांना अजूनही ही रक्कम मिळू शकते.
निवडणुकांच्या सर्वेतून भाजपची
चिंता वाढवणारे आकडे
पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानं आता महत्त्वाचे मानले जाणारे निवडणुकांचे सर्वेही समोर येऊ लागले आहे. या सर्वेतून भाजपची चिंता वाढवणारे आकडे हाती आले आहेत. आगामी पाच राज्यांपैकी तीन राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. किती राज्यात भाजप पुन्हा सत्ता राखून शकेल, हे दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अशातच अंतिम टप्प्यात महत्त्वाचे मानले जाणारे सर्वे जे आकडे सांगत आहेत, ते भाजपला विचार करायला भाग पाडणारे असे आहेत.
SD social media
9850 60 35 90