कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात मजुरांचा कैवारी म्हणून अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) जगासमोर आला. सोनू सूद गरजू कामगार आणि लोकांना करत असलेल्या मदतीमुळे जगभरात त्याला एक वेगळी ओळख मिळाली. आता त्याच्या कुटुंबातील सदस्याने सक्रिय राजकारण उडी घेतली आहे. सोनू सूदची बहीण मालविका सूद (Malvika Sood) यांनी आज पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
एका चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आमच्या पक्षात आला ही आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी चन्नी यांनी दिलीय. तर सोनू सूद मानवता आणि दयाळू वृत्तीमुळे संपूर्ण जगात ओळखले जातात. आज त्यांच्या परिवरातील एक सदस्य आमच्याशी जोडला गेला आहे. त्या सुशिक्षित महिला आहेत, असं नवज्योत सिंह सिद्धू यांनी म्हटलंय.
निवडणूक आयोगाने शनिवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी 14 फेब्रुवारीरोजी मतदान होईल. तर निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. अशावेळी मालविका सूद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पंजाब काँग्रेसला मोठं बळ मिळाल्याचं बोललं जात आहे.
यापूर्वी सोमवारी नवज्योत सिंह सिद्धू यांनी मोगामध्ये अभिनेता सोनू सूद आणि त्याची बहीण मालविका सूद सचर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज मालविका सूद यांनी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय. अशावेळी काँग्रेस मालविका सूद यांना मोगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.