जळगाव येथील कांताई बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला एक सोळा वर्षीय मुलगा बुडाला आहे. नयन निंबाळकर असं बंधाऱ्यात बुडालेल्या मुलाचं नाव आहे. तर, नयनसोबत असलेल्या इतर चार जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. हे सर्वजण पोहण्यासाठी बंधाऱ्यात उतरले होते, याचवेळी ही दुर्घटना घडली.
नयन निंबाळकर आणि अन्य तरुण-तरुणी कांताई बंधाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान नयन निंबाळकर याच्यासह अन्य 4 जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण पाण्यात बुडू लागले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. यानंतर स्थानिकांनी तात्काळ याठिकाणी धाव घेत बुडणाऱ्या पाचही जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत चार जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. मात्र, नयन निंबाळकर हा 16 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला. दरम्यान बुडालेला मुलगा अद्यापही बेपत्ता असून स्थानिकांच्या मदतीने त्या मुलाचा शोध सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर परिसरातील दूध फेडरेशनजवळील मिथिला अपार्टमेंटमधील काही मुला-मुलींनी रविवारी कांताई बंधारा परिसरात रविवारची ट्रिप काढली होती. यावेळी ही घटना घडली.
शहरापासून जवळच मोहाडी गावाच्या पुढे गिरणा नदीवर असलेलाल कांताई बंधारा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. इथे नेहमी परिसरातील नागरिकांची वर्दळ असते. बरेच लोक सुट्टीच्या दिवशी याठिकाणी सहलीला येत असतात. मात्र, सहलीला आलेला हा १६ वर्षीय तरुण अशाप्रकारे बुडाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.