कोरोनाच्या संकटानंतर राज्यासमोर आता लम्पी आजाराचे संकट उभे ठाकले आहे. दुभत्या जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली असून याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळातील उर्से गावात सर्वात जास्त लागण झाल्याचं चित्रं आहे. गावात आतापर्यंत वीस जनावरे बाधित झाली असून तर 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
उर्से गावात 20 जनावरांना लम्पीस्किन विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूचा बाह्य कीटकांद्वारे प्रसार होतो. त्यामुळे शासन नियमानुसार दहा किलोमीटरच्या परिसरातील जनावरांच्या लसीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या विषाणूची लागण झाल्याने जनावरांना ताप येऊन दूध उत्पादन घटण्याची शक्यता असते. जनावरे चारा खात नाही, या जनावरांना तापाची औषध देणे आणि लसीकरण करणे आवश्यक आहे.
मावळात 52 हजाराच्या वर पशुधन आहे. यात गाय, बैल पंचवीस हजार तर म्हैस वर्गात 26 हजार पशुधन आहे. परंतु उर्से गावात या रोगाची लागण जास्त झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे जनावरांचे लसीकरण केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांत त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. हा प्रभाव वर्षभर टिकून राहतो असं पशुवैद्यकीय अधिकारी यांचा निष्कर्ष आहे.
आतापर्यंत पशुसंवर्धन खात्याने नवलाख उंब्रे, जाधववाडी, मेंढेवडी, या गावात लक्ष जास्त दिले आहे. या दरम्यान 4883 लसीकरण पूर्ण केले आहे. लम्पीस्किन विषाणू या रोगाची बाधा गाय, म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसते. त्यामुळे रोगी जनावरे अधिक अशक्त होतात. मात्र जनावरां मध्ये लक्षणे आणि आजार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तालुक्यातील पशुसंवर्धन केंद्रात कळवावे आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत योग्य ते उपचार आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.