आज दि.२७ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पृथ्वीच्या दिशेनं येतंय भलमोठं संकट

एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॕडमिनिस्ट्रेशन) ने या चेस्टेरॉइडला इशारा दिला आहे. या लघुग्रहाचा आकार खूप मोठा असल्याने तो पृथ्वीवर आदळला तर कहर होऊ शकतो. त्यावर नासाचे शास्त्रज्ञ सतत लक्ष ठेवून आहेत. हा लघुग्रह मोठा आहे आणि तो वेगाने पुढे जात आहे आणि तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे.अंतराळ शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या या लघुग्रहाची उंची सुमारे 65 फूट आहे आणि ती पृथ्वीच्या 4 दशलक्ष किलोमीटरच्या आत जाईल. खूप लांबचा पल्ला आहे. हा लघुग्रह 15,408 किमी/तास वेगाने पृथ्वीजवळून जाईल. काही अनपेक्षित घडल्यास पृथ्वीवर होलोकॉस्ट म्हणजेच मानवी जीविताचा संपूर्ण विध्वंस होईल, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.पृथ्वीवरील संभाव्य धोक्यांचा मागोवा ठेवण्यासाठी, NASA ने प्लॅनेटरी डिफेन्स (NEO) तयार करण्यासाठी अनेक क्षेत्रातील तज्ञांची एक टीम एकत्र केली आहे. सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS), जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL), आणि स्मॉल-बॉडी डेटाबेस हे सर्व या पथकात आहेत.शास्त्रज्ञांनी या नवीन लघुग्रहाला 2022 UD72 असे नाव दिले आहे. नावातील चार अंकी संख्या त्याच्या शोधाची तारीख, ऑक्टोबर 2022 दर्शवते.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि ऑस्कर विजेत्या गायिकेचं निधन, 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतून अनेक दुःखद बातम्या समोर येत आहे. कोणाचं ना कोणाचं निधन होत असल्याचं समोर येत आहे. अशातच आणखी एका गायकाचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ‘फेम’ चित्रपटाची स्टार आणि ‘फ्लॅशडान्स’चे शीर्षक गीत गायलेली ऑस्कर विजेती गायिका इरेन कारा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याची बातमी समोर येताच जवळच्या व्यक्तींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री इरेन “फ्लॅशडान्स… व्हाट अ फीलिंग” गाण्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्यासाठी त्यांना ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार मिळाला. इरेन कारा यांनी नंतर क्लिंट ईस्टवुड आणि टॅटम ओ’नील यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केले. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या मॅनेजरने त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अभिनेत्रीचा फ्लोरिडा येथील तिच्या घरी मृत्यू झाला, मात्र यामागचे कारण सध्या समजू शकलेले नाही.

भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकच्या म्हैसूरमधील घटना

कर्नाटकातील म्हैसूर येथील बसस्टॉपवर बसवलेले वादग्रस्त घुमट रविवारी एका रात्रीत काढून टाकण्यात आले आहेत. हे घुमट पाडण्याची धमकी भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांनी दिल्यानंतर आता ते नाहीसे झाले आहेत. या बसस्टॉपवर मध्यभागी एक मोठा आणि आजुबाजुला दोन लहान घुमट बसवण्यात आले होते. हे घुमट मशिदीसारखे दिसत असल्याचा दावा करत सिम्हा यांनी ते काढून टाकण्यासाठी अल्टिमेटम दिला होता.याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकाऱ्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. “बसस्टॉपबाबत वाद नको. मी आत्तापर्यंत म्हैसुरमध्ये १२ बसस्टॉप बांधले आहेत. मात्र, या बसस्टॉपला जातीय रंग देण्यात आल्याने मी दुखावलो आहे. ज्येष्ठांच्या सल्लामसलतीनंतर मोठा घुमट कायम ठेवून आजुबाजुचे दोन घुमट काढून टाकले आहेत. लोकांनी याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. विकासाच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे”, असे स्पष्टीकरण घुमट हटवणाऱ्या रामदास यांनी दिलं आहे.

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील दुफळी समोर

मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांची सभा होणार आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा पुण्यातील मनसेची अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याचं दिसतंय. दोन दिवसांपूर्वी मनसेचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला वसंत मोरे यांची देखील उपस्थिती होती. मात्र शहर पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित असूनही मेळाव्यात त्यांना बोलण्याची संंधी न दिल्यानं ते नाराज झाले आहेत.

मुंबईकर बारमध्ये जाताना जपून, स्टाटरम्हणून कबुतर मिळू शकते, पोलिसांत तक्रार

मुंबईत महानगरपालिका क्षेत्रात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान मुंबईत काही बारमध्ये स्टाटरसाठी कबुतर खायला देत असल्याचा धक्कादायक प्रकार निवृत्त लष्कर अधिकाऱ्याच्या निदर्शनास आला आहे. हा प्रकार कॅप्टन हरिश गगलानी यांनी उघडकीस आणला आहे. त्यांनी मुंबईतील बारमध्ये कबुतरे खायला देत असल्याचा आरोप पोलिसांकडे केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दाखल घेत तक्रार दाखल करून घेतली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे.

वाचाळपणा बंद करा अन्यथा… राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर प्रहार

उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपणा कराल तर एकटे पडाल अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या बुलडाण्याच्या सभेतील वक्तव्याचा समाचार घेतला.

जनाची नाही, मनाची तरी ठेवा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुलढाणा येथील सभेत केली होती. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलताना भान ठेवायला हवे. ते एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. सत्ता गेल्याचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. आपण जे बोलतोय त्याचे भान त्यांना नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

गुवाहाटीत ‘व्यवस्था’ केल्यामुळे शिंदे सरकार खूश, आसाम सरकारला देणार नवी मुंबईत जागा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला पोहोचले. सत्तासंघर्षाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना विशेष भेट दिली आहे. नवी मुंबईमध्ये आसाम भवन उभारण्यासाठी जमीन देण्याचे आश्वासन शिंदेंनी दिलं आहे. तसंच, आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यास मदत करणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं.मुख्यमंत्री शिंदे हे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर असून त्यांच्यासह आलेले आमदार, खासदार, पदाधिकारी यांची सारी व्यवस्था आसाम सरकारने केली होती. तसंच राज्यात सत्ता स्थापना झाल्यावर पुन्हा एकदा गुवाहाटीला येण्याची विनंती देखील केलेली होती, त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री सरमा यांनी या सर्वांसाठी खास प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी सरमा यांनी राज्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटूंबियांची आस्थेने विचारपूस केली. तब्बल दोन तास हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना खास गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. तसंच आता एकदा महाराष्ट्राचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी सरमा यांनी नक्की यावे असे सांगून त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले.

पदयात्रेतून ब्रेक घेत राहुल गांधींनी चालवली बाईक, ‘भारत जोडो’ यात्रेत दिसला खास अंदाज

मध्य प्रदेशातील ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रवासाची सुरुवात रविवारी मोठ्या उत्साहात झाली. या यात्रेदरम्यान इंदूरमध्ये खासदार राहुल गांधींनी बाईक चालवण्याचा आनंद लुटला. गेल्या काही वर्षात एकामागोमाग झालेल्या पराभवानंतर जनतेशी जनसंपर्क वाढवण्यासाठी काढण्यात आलेली कन्याकुमारी ते श्रीनगर अशी ही ‘भारत जोडो’ यात्रा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास करत आहे.

या व्हिडीओत राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ब्लू कार्पेटवर बाईक चालवताना दिसत आहेत. यावेळी रस्ता मोकळा करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झालेली पाहायला मिळाली. पदयात्रेदरम्यान निवांत क्षणी फुटबॉल खेळतानाचा राहुल गांधींचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. आदिवासींसोबत नृत्याचा आनंदही लुटताना ते दिसले होते.

चीनमध्ये करोनाचा हाहाकार, कठोर निर्बंधाविरोधात नागरिक रस्त्यावर

मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोनाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. रविवारी ४० हजार नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सरकारकडून शून्य करोना रुग्ण धोरण राबवण्यात येत आहे. त्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधाविरोधात चीनचे नागरिक रस्त्यावर उतरले असून, राष्ट्रपती शी जिनपींग यांना हटवण्याची मागणी करत आहेत.

शांघाई शहरात रविवारी लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निरर्शन करत आहेत. ‘शी जिंनपिग यांना हटवा,’ ‘कम्युनिस्ट पक्षाला हटवा’, ‘आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे’, अशा घोषणा नागरिक देत आहेत. या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संततधार पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना अखेर रद्द, टीम इंडियाच्या मालिका विजयाच्या स्वप्नावर पाणी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार होता. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो अशा प्रकारचा असणार होता. हा सामना गमावल्याने भारतीय संघ मालिकाही गमावेल अशी परिस्थिती होती. शेवटी न्यूझीलंडमध्ये शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले. मालिका वाचविण्यासाठी भारताला तिसरा आणि अंतिम सामना जिंकणे गरजेचा आहे, जेणेकरून मालिकेत बरोबरी साधता येईल.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.