करोनाने पुन्हा डोकं वर काढलं, २४ तासांत आढळले १४८ नवे रुग्ण, ८०८ रुग्णांवर उपचार
देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक महिन्यांनंतर देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १४८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ८०८ करोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. याचाच अर्थ देशात सातत्याने करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. चीनमध्ये एका गूढ आजाराने तिथल्या आरोग्य विभागाची चिंता वाढवलेली असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.चीनमध्ये न्यूमोनियाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याने तिथला आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. एका बाजूला चीनमधील वैज्ञानिक या नव्या न्यूमोनियावर संशोधन करत असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भारताचं आरोग्य मंत्रालय सतर्क झालं आहे. सध्या तरी या गोष्टीची अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं म्हटलं जात आहे. कारण भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. परंतु, लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
“मोहोब्बतच्या दुकानामागे गरिबांना लुटणारे…”, काँग्रेस खासदारावरील प्राप्तीकर विभागाच्या धाडींवरून भाजपाचा टोला
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार धीरज साहू यांच्या कंपनीच्या कार्यालय आणि निवासस्थानावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकून बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. प्राप्तीकर विभागाने झारखंड, ओडिशामध्ये धाडी टाकून ही मालमत्ता जप्त केली आहे. कपाटात ठासून भरलेले नोटांचे बंडल… पाचशे, दोनशे, शंभर रुपयांच्या नोटांच्या बंडलांच्या इमारती पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले असतील. या छापेमारीत आतापर्यंत २१० कोटी रुपये प्राप्तीकर विभागाच्या हाती लागले आहेत. अजूनही कारवाई सुरू असून ही रक्कम आणखी वाढू शकते.दरम्यान, काँग्रेस खासदारावरील या मोठ्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते ओडिशा-झारखंडमधील आमदारांपर्यंत अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावं आणि त्यानंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणं ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब यांना द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे.”
राजस्थानला ‘योगी’ मिळणार नाहीत? मुख्यमंत्रिपदाबाबत बालकनाथ यांचं सूचक वक्तव्य
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं आहे. राज्यातल्या २०० जागांपैकी ११० जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपाने काँग्रेसच्या ताब्यात असलेलं हे हाज्य हिसकावलं आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी भाजपा राजस्थानात सत्ता स्थापन करू शकलेली नाही. पक्ष अद्याप राज्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं याचा निर्णय घेऊ शकलेला नाही. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, दिया कुमारी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत आणि राजस्थानचे ‘योगी’ अशी ओळख असलेले महंत बालकनाथ हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपाने पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे, सरोज पांडेय यांना राजस्थानचे पर्यवेक्षक म्हणून नेमलं आहे. हे तीन नेते राजस्थानमधील भाजपा आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतील.दरम्यान, महंत बालकनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. कारण त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे पहिल्यांदा खासदार आणि आता आमदार झालो आहे. यानिमित्ताने मला राष्ट्रसेवेची संधी मिळाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर जी चर्चा चालू आहे त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करावं. मला सध्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनात अधिक अनुभव घ्यायचा आहे.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातल्या आरोपीला उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मोहन नायक असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात जामीन मिळणारा मोहन नायक हा पहिलाच आरोपी आहे. जस्टिस एस. विश्वजीत शेट्टी यांच्या एकल पीठाने आरोपीला जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मोहन नायकला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका उद्यापासून म्हणजेच १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उभय संघांमधला पहिला टी-२० सामना दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे खेळवला जाणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. भारतीय संघानेही दक्षिण आफ्रिकेत पोहोचून जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या सामन्याचा तुम्ही घरी बसून आनंद घेऊ शकता. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे विनामूल्य पाहता येणार जाणून घेऊया.भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामने डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहेत. याशिवाय जर तुम्हाला टीव्हीवर सामना पाहायचा असेल, तर तुम्ही तो स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. अशा परिस्थितीत सामना पाहण्यासाठी तुम्हाला तुमचे पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला डिस्नी प्लस हॉटस्टारचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना १० डिसेंबरला खेळवला जाईल, दुसरा सामना १२ डिसेंबरला आणि त्यानंतर तिसरा सामना १४ डिसेंबरला खेळवला जाईल.
म्युच्युअल फंड एसआयपी आता २५० रुपयांपासून सुरू करता येणार, सेबी प्रमुखांनी सांगितली योजना
बाजार नियामक सेबीला म्युच्युअल फंडां (Mutual Funds)मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा आहे. यासाठी सेबीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची मर्यादा २५० रुपये करायची आहे. असे झाल्यास अगदी लहान गुंतवणूकदारही दरमहा SIP (Systematic Investment Plans) द्वारे आपला गुंतवणुकीचा प्रवास सहज सुरू करू शकतो. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी एका कार्यक्रमादरम्यान या योजनेचा खुलासा केला.सेबी प्रमुख पुरी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा म्युच्युअल फंड उद्योग ५० ट्रिलियन रुपयांचा झाला आहे. ते म्हणाले की, म्युच्युअल फंडातील छोट्या गुंतवणुकीच्या योजना प्रत्येक व्यक्तीला आर्थिक व्यवस्थेशी जोडण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे भारतीय शेअर बाजाराचाही विकास होईल. त्यामुळे सेबी म्युच्युअल फंड चालवणाऱ्या कंपन्यांसह २५० रुपयांच्या एसआयपीची शक्यता तपासत आहे. ही SIP अस्तित्वात आणण्यासाठी सेबी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
बँक निफ्टी ऐतिहासिक पातळीवर!
शुक्रवारी (८ डिसेंबर २०२३) रोजी झालेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत ‘रेपो दरा’त कोणताही बदल न होता ‘जैसे थे’ या स्थितीत राखण्याचा निर्णय जाहीर केला गेला. रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हा निर्णय मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने घेतल्याचे सूचित केले. बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचा असलेला रेपो दर सलग पाच वेळा झालेल्या कमिटीच्या मीटिंगमध्ये जैसे थे म्हणजेच ६.५ % या पातळीवर स्थिर ठेवण्यात आला.
प्रसिद्ध अभिनेत्रीचे अवघ्या २४ व्या वर्षी निधन, परदेशात आला हृदयविकाराचा झटका
मल्याळम सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या २४ व्या वर्षी एका अभिनेत्रीचे निधन झाले आहे. लक्ष्मीका सजीवन असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तिच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. लक्ष्मीका ही उत्तम अभिनेत्री होती, तिने कमी वयात आपल्या अभिनयाने नाव कमावलं होतं.लक्ष्मीका सजीवनचे शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती येथील शारजाहमध्ये निधन झाले. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ती शारजाहमधील एका बँकेत काम करत होती. तिच्या निधनाची बातमी कळताच चाहते सोशल मीडियावर पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत. अनेकजण तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अवघ्या २४ व्या वर्षी लक्ष्मीकाचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
SD Social Media
9850603590