महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नुकतंच राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ब्रेक द चैन अंतर्गत नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोव्हिड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यानुसार या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना 48 तास आधी कोरोना चाचणी अनिर्वाय असणार आहे. तसेच या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे यात म्हटलं आहे. सहा राज्यातून केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनासदृश कोणतीही लक्षणं आहे की नाही, याची खात्री करुनच परवानगी दिली जाणार आहे. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे. राज्यात काल मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. काल एकूण 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.58 टक्के आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 60 हजार 473 कोरोनाबाधित रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तसेच राज्यात काल 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के झाले आहे.