बडगाम येथे काश्मिरी पंडित समाजाच्या राहुल भट यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. त्याच्या निषेधार्थ श्रीनगर विमानतळाच्या दिशेने निघालेल्या संतप्त काश्मिरी पंडितांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला.हे निदर्शक सर्वप्रथम मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील शेखपोरा भागात जमले. त्यानंतर त्यांनी विमानतळाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या पथकाने त्यांना थांबवले. या जमावास तेथून निघून जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मात्र, हा जमाव विमानतळाच्या दिशेने जाऊ लागला. त्यांना रोखण्यासाठी व जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.
काश्मिरी पंडित येथे गुरुवारपासून शोकसंतप्त निदर्शने करत आहेत. पंडितांच्या जीविताचे रक्षण करण्यात सरकार-प्रशासनाला अपयश आल्याचा त्यांचा आरोप आहे. गुरुवारी ३५ वर्षीय राहुल भट या काश्मिरी पंडित महसूल कर्मचाऱ्याची बडगाम जिल्ह्यातील चादूरा भागातील वर्दळीच्या तहसील कार्यालयाच्या परिसरात दिवसाढवळय़ा घुसून दोन दहशतवाद्यांनी हत्या केली.
-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्याला घरातच स्थानबद्ध करून ठेवल्याचा दावा करून बडगाम येथे निदर्शने करणाऱ्या शोकसंतप्त काश्मिरी पंडितांना भेटून, त्यांचे सांत्वन करण्यासाठी आपल्याला जाऊ दिले जात नाही, असा आरोप प्रशासनावर केला. मात्र, मेहबूबांचा हा दावा पोलीस आणि प्रशासनाने फेटाळला आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही न्याय्य आणि योग्य मागणी करणाऱ्या काश्मिरी पंडित निदर्शकांना अशी निष्ठुर वागणूक मिळणे, हे लज्जास्पद असल्याची टीका केली. त्यांनी नमूद केले की, काश्मीरच्या लोकांसाठी हे नवीन नाही, कारण जेव्हा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे हातोडाच असेल, तेव्हा प्रत्येक समस्या त्यांना खिळय़ासारखीच वाटते. सरकार काश्मिरी पंडितांचे संरक्षण करत नसेल, तर निदर्शने करणे हा त्यांचा हक्क आहे. काश्मीरमधील पर्यटन सुरळीत झाले, म्हणजे सर्व परिस्थिती सुरळीत झाली असे नव्हे. कुठल्याच निकषावर आज काश्मीरमध्ये शांतता निर्माण झाली असे म्हणता येत नाही. लक्ष्य करून हत्या करण्याचे प्रकार काश्मीरमध्ये थांबलेलेच नाहीत. राहुल हे काल त्यांच्या कार्यालयात होते. रियाझ अहमद ठोकेर हे पोलीस कर्मचारी त्यांच्या घरात होते. तेथे त्यांच्या हत्या झाल्या. मी त्यांच्या हत्यांचा निषेध करतो, असे अब्दुल्ला म्हणाले.