देशाप्रमाणे काँग्रेसही अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. म्हणून निव्वळ जिवंत राहण्यासाठी नव्हे तर, पक्षाच्या वाढीसाठी संघटनात्मक बदल करावेच लागतील. नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटनात्मक सुधारणा कराव्या लागतील. पक्षाची रणनीतीही बदलावी लागेल. अगदी पक्षाच्या दैनंदिन कार्यपद्धतीमध्येही परिवर्तन करावे लागेल, असा स्पष्ट संदेश काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबिराच्या सुरुवातीला केलेल्या भाषणात दिला.
काँग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबीर उदयपूर येथे सुरू झाले. नेत्यांनी आता व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांना आळा घालून पक्षाला प्राधान्य दिले पाहिजे. पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असा निर्वाणीचा इशारा सोनिया गांधी यांनी ४०० हून अधिक पदाधिकाऱ्यांना दिला. पक्षामध्ये संघटनात्मक बदलाची मागणी बंडखोर नेत्यांनी वारंवार केली होती.
नेत्यांचा प्रमुख आक्षेप राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर होता. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत सोनिया यांनी कोणा एका नेत्यावर वा नेतृत्वाला लक्ष्य करून प्रश्न सुटणार नाही, असे सूचित केले. पक्षाला मजबूत करण्याचे काम एकटय़ा-दुकटय़ाचे नाही. व्यापक सामूहिक प्रयत्नांमधूनच ते लक्ष्य गाठता येऊ शकते. हे चिंतन शिबीर त्यादृष्टीने टाकलेले प्रभावी पाऊल असेल, असेही सोनिया यांनी नमूद केले.
कपिल सिबल यांच्यासारखे नेते पक्षातील मतभेद अंतर्गत व्यासपीठावर न मांडता प्रसारमाध्यमांकडे व्यक्त करतात. त्याची गंभीर दखलही सोनियांनी घेतली. तुम्ही तुमचे विचार-मतभेद पक्षांतर्गत चर्चामध्ये उघडपणे मांडा पण, त्याची जाहीर वाच्यता करू नका. जाहीरपणे बोलताना एकीचाच संदेश दिला पाहिजे. संघटनात्मक एकता, संघटना मजबुतीसाठी सुरू असलेले कार्य आणि त्यासाठीचा दृढनिश्चय हे तीन मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, असे सोनियांनी स्पष्ट केले.
संघ आणि भाजपने देशासमोर सामाजिक ध्रुवीकरणाचे आव्हान उभे केले आहे. एका बाजूला पं. नेहरूंचे देश घडवण्यातील योगदान अमान्य केले जात आहे तर, दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण सुरू आहे, असा आरोप सोनियांनी केला. दलित, अल्पसंख्य समाजाविरोधातील घटना, त्यांना दिली जाणारी दुय्यम नागरिकत्वाची वागणूक, आर्थिक समस्या, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, नोटबंदीचे दुष्परिणाम, बेरोजगारी आदी अनेक मुद्दय़ांचा ऊहापोह सोनियांनी भाषणात केला.
सोनियांच्या भाषणानंतर चिंतन शिबिरातील ठरावांवर चर्चा सुरू झाली. सोनियांच्या भाषणाआधीच पदाधिकाऱ्यांना मोबाइल फोन बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. पक्षांतर्गत चर्चेचा बोभाटा बाहेर केला जाऊ नये याची दक्षता घेण्यात आली. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये मुख्यालयात झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीतील मुद्दे चर्चा सुरू असताना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवले जात होते. हे टाळण्यासाठी शिबिरात खूपच दक्षता घेतली असल्याचे आढळले.