मराठी साहित्यात विश्वात आपल्या प्रतिभेने तळपणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश करण्याची उपरती अखेर आयोजकांना झाली आहे. त्यासाठी संमेलन गीत पुन्हा नव्याने तयार करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ना त्या कारणाने सतत वादात आहे. सुरुवातीला निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची वादावादी चांगलीच रंगली. संमेलनाच्या तारखांसाठी खोटी कारणे पुढे का केली म्हणत कौतिककराव ठाले-पाटील यांनी जातेगावकरांना पत्र लिहून सुनावले होते. हा वाद शमतो ना शमतो तोच साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावच टाकले नसल्याचे समोर आले. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे.
नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे 1938 मध्ये झालेल्या 23 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. खरे तर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भगूर, नाशिक येथे झाला. त्यांनी जवळपास पन्नासच्यावर पुस्तके लिहिली. त्यात 1857 चे स्वातंत्र्यसमर, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड , शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता, क्ष – किरणें अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही सावरकरांच्या नावाचा उल्लेख साहित्य संमेलन गीतात उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे संमेलन गीतामध्ये साम्यवादापासून ते थेट ‘भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे’ असा उल्लेख होता.
नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख होता. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख जाणूनबुजून टाळल्याची चर्चा होती. त्यावरून सावकरप्रेमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. अखेर वाढता रोष पाहता संमेलन गीतामध्ये सावरकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलन गीताच्या एका ओळीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार साहित्य संमेलन गीतातील नवे कडवे असे आहे.
रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती
ज्ञानाने सोपान गाठता मुक्त होय निवृत्ती
गडकिल्ले हे शिवरायांना सदैव वंदन करती
स्वातंत्र्य सूर्य सावरकर उजळे अनंत क्षितीजावरती
याबाबत गीतकार मिलिंद गांधी यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख पूर्वीही संमेलन गीतामध्ये होता. मात्र, तो स्वातंत्र्य सूर्य असा केला होता. त्यावर काही जणांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचा उल्लेख टाळायचा वगैरे काहीही हेतू नव्हता.’