कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही लाट येण्यापूर्वीच बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. काल बारामतीत एकाच दिवसात 69 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासानाचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे बारामतीत लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे.
बारामतीत गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे. काल झालेल्या तपासणीमध्ये कोरोनाचे नवीन 69 रुग्ण आढळून आले आहेत. बारामतीत आतापर्यंत 26774 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 25743 रुग्ण बरे झाले आहेत तर 680 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अचानक कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे, परंतु प्रशासनाने उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढता कामा नये. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहन पवारांनी केलं होतं. त्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दरम्यान बारामतीत 18 जुलैपासून 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनला दहा दिवस झाल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बारामतीत शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात येत आहे. बारामतीत 16 जुलै रोजी दिवसभरात 65 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे दररोज वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बारामतीत बंद ठेवण्यात येत आहे.