मागच्या काही दिवसात टीव्ही चॅनेलवर तुम्ही किरण माने हे नाव ऐकलं नाही, असा दिवस उजाडला नाही. किरण माने आणि त्यांच्या भोवतीचा वाद आता अधिकाधिक गुढ होत चाललाय. आजच्या दिवसाची सुरूवात झाली ती किरण माने यांच्या सहकलाकारांनी मानेंच्याविरोधात आळवलेल्या सुरांनी. “किरण माने यांनी आम्हाला त्रास दिला, त्यांच्या वागणुकीचा इतर कलाकारांना त्रास झाला”, असा आरोप या कलाकारांनी केला. या सगळ्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला.
योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं म्हणत मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी किरण माने यांच्याविरोधात मत मांडलं. मनसे पाठोपाठ शिवसेनेनेही किरण माने यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, ‘किरण माने यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते असा वाद निर्माण करत आहेत. हा सगळा वेडेपणा आहे.’
किरण माने यांची फेसबुक पोस्ट आणि त्यांना मालिकेतून काढून टाकल्याप्रकरणी आदेश बांदेकर यांना विचारलं असता, ते म्हणाले, “मागच्या अनेक वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण इतक्या दिवसात मला असा कुठलाही अनुभव आलेला नाही. कुठलंही चॅनेल असं करत नाही. किरण माने यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते हे सगळं करत आहेत”, असं आदेश बांदेकर म्हणाले.
स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांनी केला. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘नाट्यगृहात एक किंवा दोन प्रेक्षक असल्याने घाबरुन कधी नाटकाचा प्रयोग रद्द केला नाही. हाऊस फुल्ल असल्यासारखं रेटून प्रयोग करूनच घरी आलो. दम हाय छातीत भावा!’, अशी फेसबुक पोस्ट किरण यांनी फेसबुकवर लिहिली. यात कुठेही एखाद्या राजकीय पक्षाचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. मात्र या पोस्टचा अनेकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्याशी संदर्भ जोडला. पंजाबमध्ये सध्या विधानसभेची निवडणूक होतेय. याच निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये गेले. मात्र स्थानिक लोकांनी पंतप्रधानांच्या ताफ्याची अडवणूक केली. त्यावेळी पंजाबमधल्या एका उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा जवळजवळ 15 ते 20 तास अडकून पडला. पंतप्रधानांना इतका वेळ एकाच जागी थांबावं लागल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. याला पंजाबमधलं काँग्रेसचं सरकार जबाबदार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. हे सगळं पंजाबमध्ये घडत असताना पंतप्रधानांच्या सुरक्षेला घेऊन देशभर प्रतिक्रिया उमटू लागल्या. याच दिवशी किरण माने यांनी ही फेसबुक पोस्ट लिहिली. यानंतर ती पोस्ट पंतप्रधानांना उद्देशून लिहिल्याचा दावा करत माने यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र यात कुणा नेत्याचा किंवा पक्षाचा उल्लेख केला नसल्याचं माने यांचं म्हणणं आहे.