वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन मुलांनी तीर्थयात्रेला जाण्याचं ठरवलंय. हे दोन मुलगे त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार गावतल्या 250 लोकांना घेऊन ऋषिकेश आणि हरिद्वारला तीर्थयात्रेसाठी निघाले आहेत. या दोन भावांनी ग्रामस्थांसह गुरुवारी ट्रेन पकडली. या वेळी, यात्रेकरूंचा उत्साह पाहण्यासारखा होता. या दोन भावांचे वडील ग्रामस्थांना घेऊन हरिद्वारला जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची पुण्यतिथी येत्या 15 एप्रिलला आहे. त्यांची मुलं त्यांचं हे अधुरं स्वप्न पूर्ण करत आहेत.
जोगेंद्रसिंह चौहान आणि राजेंद्रसिंह चौहान अशी या मुलांची नावं आहेत. त्यांचे वडील तानसिंग चौहान यांचं मागील वर्षी निधन झालं. ते भारत-पाक सीमेवर वसलेल्या बारमेर येथील रहिवासी आहेत. ते वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 250 लोकांना देवभूमी हरिद्वारला जाण्यासाठी रवाना झाले. हे दोन भाऊ त्यांच्या सोबतच्या 250 लोकांचा प्रवास, राहणं आणि जेवणाचा पूर्ण खर्च स्वतः उचलणार आहेत. या सर्वांना निरोप देतेवेळी बारमेरच्या रेल्वे स्थानकाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. त्यांची गाडी देवभूमीकडे रवाना झाली तेव्हा यात्रेकरूंमध्ये मोठा उत्साह होता.
तानसिंग यांनी ट्रक ड्रायव्हर म्हणून केली सुरुवात
तानसिंग चौहान हे उद्योजक होते. बाडमेरमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून सुरुवात करणारे तान सिंह चौहान हे राजस्थानचे सर्वात मोठ्या प्राप्तिकर भरणाऱ्यांपैकी आहेत. ते आजारपणामुळे अचानक हे जग सोडून गेले. त्यांचं गावातल्या लोकांना तीर्थयात्रेला नेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची दोन्ही मुलं जोगेंद्रसिंह चौहान आणि राजेंद्रसिंह चौहान यांनी पुढाकार घेतला. याबाबत त्यांनी आपल्या गावातील व आजूबाजूच्या गावातील लोकांशी सल्लामसलत केली. देवभूमीच्या दर्शनासाठी शेकडो लोकांची यादी तयार करण्यात आली होती. त्यापैकी 250 जणांना आज हरिद्वारला पाठवण्यात आलं आहे. या प्रवासात सहभागी झालेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रवासाचा एक भाग होण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत.
बाडमेरहून निघालेली यात्रेकरूंची तुकडी बिकानेर आणि चंदीगडमार्गे हरिद्वारला पोहोचेल. हरिद्वारनंतर ऋषिकेशलाही या ग्रुपचा मुक्काम असेल. या यात्रेतील प्रवाशांना निरोप देण्यासाठी बाडमेर जिल्हाप्रमुख महेंद्र चौधरी आणि बारमेर नगरपरिषदेचे अध्यक्ष दिलीप माळीही पोहोचले.