राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलं असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं आहे. ट्विट करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, की पोलिसांनी माझ्या विरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे.. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला.
40 वर्षीय तक्रारदार महिलेने एका कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.