शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येणार? दीपक केसरकर म्हणाले ‘राज्याच्या जनतेची इच्छा…’

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र, आता मंत्री दीपक केसरकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं, अशी इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आहे.

मंत्री दीपक केसरकर नवी मुंबईतील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना म्हणाले, की दोन्ही गट एकत्र येणार की नाही हे मी सांगू शकत नाही. मात्र दोन्ही गट एकत्र यावे ही राज्याच्या जनतेची इच्छा आहे. यासोबतच अमोल किर्तीकरांबाबतही केसरकरांनी मोठा गौप्यस्फोट केला. अमोल किर्तीकर लवकरच बाळासाहेबांच्या विचारासोबत येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटामध्येच आहेत. रविवारी संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांची भेट घेतली. यानंतर आता दीपक केसरकर यांनी असा दावा केला असल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार का? असा प्रश्न चर्चेत येत आहे. एकनाथ शिंदे हे वारंवार उद्धव ठाकरे यांना धक्के देतच आहेत. रविवारीच ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि उदय सामंत यांच्यात रत्नागिरीमध्ये तब्बल एक तास गुप्त बैठक झाली. उदय सामंत आणि राजन साळवी यांच्या बैठकीत काय राजकीय चर्चा झाली? यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता केसरकर यांचं विधानही चर्चेत आलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे षड्यंत्र ओळखून सर्व शिवसैनिक बाहेर पडून बाळासाहेबांच्या विचारासोबत येतील, असा विश्वासही दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच नवी मुंबईत लवकरच मराठी भाषा भवन उभे राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.