राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा हा आषाढी एकादशीआधी म्हणजे येत्या 10 जुलै आधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. पण काही कारणास्तव मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा दोन दिवसांचा पहिला दिल्ली दौरा आहे. ते 8 आणि 9 जुलैला दिल्लीत असणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 10 जुलैला आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जावं लागणार आहे. त्यांना आषाढी एकादशीला पूजा करण्याचा मान मिळणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणं शक्य नाही. त्यामुळे शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार हा आता थेट आषाढी एकादशीनंतरच होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्याचे वेळापत्रक समोर आले आहे. या वेळापत्रकानुसार एकनाथ शिंदे आज दुपारी साडेचार वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेला रवाना होतील. त्यानंतर ते साडेपाच वाजता मुंबई विमानतळावरुन सरकारी चार्टड फ्लाईटने दिल्लीसाठी रवाना होतील. शिंदे संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी दिल्ली विमानतळावर दाखल होती. त्यानंतर ते रात्री अकरा वाजता दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदन येथे येतील आणि विश्रांती घेतील. तिथे त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आलेली असेल.
एकनाथ शिंदे दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असण्याची शक्यता आहे. तिथे महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील भाजपचेदेखील काही प्रमुख नेते जाणार असल्याची शक्यता आहे. भाजप आमदार आशिष शेलार हे आजच दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वूमीवर दिल्लीत खलबतं होतील. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदन येथून दिल्ली विमानतळाच्या दिशेला रवाना होतील. साडेसहा वाजता ते दिल्ली विमानतळावरुन पुण्याच्या दिशेला विमानाने रवाना होतील. ते रात्री पावने नऊ वाजेच्या सुमारास पुणे विमानतळावर दाखल होतील. तिथून ते पंढरपूरला जाण्यासाठी रवाना होतील.