टोकियोमध्ये सध्या ऑलिम्पिकची धामधूम सुरु आहे. जगभरातील 200 हून अधिक देशांचे 11 हजारांहून अधिक खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या 23 जुलैपासून सुरु झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता येत्या 8 ऑगस्टला होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 75 पदकं चीनने जिंकली आहेत. त्यात 34 सुवर्णपदकं आहेत. तर भारताच्या पारड्यात आतापर्यंत फक्त 5 पदकं असून यात 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे.
ऑलिम्पिकमध्ये जगभरातील सर्वोत्तम खेळाडू या क्रीडा स्पर्धेत सहभागी होतात.
दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य ही तीन पदके दिली जातात.
प्रत्येकवेळी डिझाईनमध्ये बदल होते
यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमधील पदकांचे डिझाईन जापानी डिझायनर जुनिची कवानिशी (Junichi Kawanishi) यांनी तयार केले आहे. कवानिशी हे ओसाका येथे राहतात. ते ग्राफिक डिझायनर आहेत. त्यांनी याआधी पॅराऑलिम्पिकसाठीच्या पदकांचे डिझाईन तयार केले होते.
ऑलिम्पिकच्या पदकांच्या डिझाईनमध्ये ग्रीक देवता नाइकीचे चित्र आहे यंदा जपानमधील धातूंचा पुनर्वापर करून जवळपास 6.21 दशलक्ष इलेक्ट्रॉनिक घटक गोळा करून ही पदके बनवण्यात आली आहेत.
पदकांची वैशिष्ट्ये काय?
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीन पदकं दिली जातात. या तिन्ही पदकांचा व्यास सुमारे 85 मिमी आहे. या पदकाची जाडी 7.7 मिलीमीटरपासून 12.1 मिलीमीटरपर्यंत असते.
ऑलिम्पिकमधील प्रत्येक अंतिम सामन्यातील विजेत्याला सुवर्णपदक दिले जाते. पण सुवर्णपदकात सोन्याचे प्रमाण फार कमी असते. खरं तर सुवर्णपदक हे शुद्ध चांदीपासून बनवतात. त्यानंतर त्यावर सोन्याचे पाणी चढवले जाते. सुवर्णपदकाचे वजन सुमारे 556 ग्रॅम इतके असते. पण यात सोने हे फक्त 6 ग्रॅम असते.
तर रौप्य पदकाचे वजन हे 550 ग्रॅम असते. यात शुद्ध चांदी असते. मात्र त्यासोबत तांबे आणि जस्त याचे मिश्रणही यात असते. रौप्य पदकात 95 टक्के तांबे आणि 5 टक्के जस्त असते.
ऑलिम्पिकमधील पदकांची किंमत किती?
ऑलिम्पिकमध्ये मिळालेली पदकं ही अमूल्य असतात. मात्र तज्ज्ञांच्या मते जर यातील सुवर्ण पदक विकले तर तुम्हाला साधारण 800 डॉलर म्हणजे साधारण 59319 रुपये मिळतात. त्याचवेळी, रौप्य आणि कांस्य पदकांची किंमत अनुक्रमे 450 डॉलर आणि 5 डॉलर इतकी आहे. ऑलिम्पिक संघटनेकडून सर्वोत्तम खेळाडूंना पदके दिली जातात. त्यासोबत काही देश या खेळाडूंचा सन्मान म्हणून विविध गोष्टी पुरस्कार स्वरुपात प्रदान करतात.