महिला रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महिलांना रेल्वेतही आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. महिला प्रवाशांसाठी आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे.
याबाबत बोलताना रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, बसमधून प्रवास करताना किंवा मेट्रोमधून प्रवास करताना महिलांसाठी आरक्षित सीटची सुविधा करण्यात येते. सीट आरक्षित असल्यामुळे त्यांचा प्रवास आरामदायी होतो. प्रवासामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. याच धर्तीवर आता रेल्वेमध्ये देखील महिलांना आरक्षित सीटचा लाभ देण्यात येणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये महिलांसाठी आरक्षित सीट असायला हवेत असा विचार सुरू होता आणि आता त्यावर प्रत्यक्ष अमंलबजावणी करण्यात आली आहे. महिलांना आता रेल्वेमध्ये देखील आरक्षित सीटची सुविधा उललब्ध होणार आहे.
लांब पल्ल्याच्या मेल गाड्या आहेत उदा: गरीब रथ, राजधानी एक्सप्रेस, दुरांतो अशा प्रत्येक गाड्याच्या स्लिपरकोचमध्ये इथून पुढे महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित असणार आहेत. सोबतच थ्री टिअर एसी डब्यामध्ये देखील महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. आरक्षित सीट पैकी लोअर सीट हे प्राधान्याने ज्येष्ठ महिला आणि गर्भवती महिला यांना देण्यात येणार आहेत. आरक्षित सीट सोबतच महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षीत व्हावा यासाठी देखील अनेक निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी यावेळी दिली.