भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अखेरचा ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना मंगळवारी खेळवला जाणार असून उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना संधी मिळते का, याकडे सर्वाचे लक्ष असेल. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ व्यवस्थापन युवा खेळाडूंना अतिरिक्त संधी देईल असे अपेक्षित होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात फारसे प्रयोग पाहायला मिळाले नाहीत. सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीविना भारताला १६०चा आकडा गाठणेही शक्य झाले नसते. ‘पॉवर-प्ले’मध्ये भारताची कामगिरी हा चिंतेचा विषय आहे. दुसऱ्या सामन्यात इशान किशनसह ऋषभ पंतला सलामीला संधी देण्यात आली, पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही. अखेरच्या सामन्यात पंतकडून संघाला अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
सॅमसनकडे आक्रमक खेळी करण्याची क्षमता आहे. मात्र, त्याला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळत नाही. पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तर दुसरा सामना जिंकत भारत मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत उमरानला संधी मिळणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. दुसरीकडे, मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी न्यूझीलंडला सामन्यात विजय अनिवार्य आहे.
- वेळ : दुपारी १२ वा.
- थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्टस, अॅमेझॉन प्राइम