कोरोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचं नवं संकट जगासमोर उभं राहिलं आहे. अशावेळी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरियंटनं कहर केलाय. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 93 हजार 45 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 111 कोरोनाबळी गेलेत. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत भयावह अशी वाढ होत आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर
बुधवारी 78 हजार 610 नवे कोरोनाबाधित
गुरुवारी 88 हजार 376 नवीन करोना रुग्णांची भर
शुक्रवारी 93 हजार 45 कोरोनाबाधित
आठवडाभरात तब्बल 4 लाख 77 हजार 229 कोरोना रुग्ण.
ओमिक्रॉननं लंडन आणि स्कॉटलँडमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटलाही मागे सोडलंय. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षा पाच पट अधिक आहे. लंडनमध्ये तर तब्बल 80 टक्के रग्ण ओमिक्रॉनमुळे बाधित झाल्याचं आढळून आलं आहे. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी प्रभावी असल्याचे कोणतेच पुरावे नाहीत, ब्रिटिश संशोधकांच्या दावानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे युरोपात आता अजून कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे एकूण 14 हजार 909 रुग्ण आढळले आहेत. तर 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण ओमिक्रॉनबाधित असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव डेल्टापेक्षा वेगानं होत असल्यानं रुग्णालायत ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढू लागलीय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ओमिक्रॉन संसर्गाचे रुग्ण 38.6 टक्के इतके आढळून येतायेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यास लस 0 ते 30 टक्के प्रभावी आहे, तर बुस्टर डोसनंतर लस 55 ते 80 टक्के प्रभावी असल्याचा दावा ब्रिटनच्या तज्ज्ञांनी केलाय.