नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम टाळा, गर्दी टाळा

नाताळ आणि नववर्ष जवळ आला आहे. त्यातच लग्न समारंभांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम टाळा, लग्न समारंभात होणारी गर्दी टाळा, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलं आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग जगभरात वेगाने फैलावत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासन वारंवार आवाहन करत असतानाही त्याचे बहुतांश ठिकाणी योग्यरित्या पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचे आढळते आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. या नियमांची पायमल्ली करणऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांनी 27 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश निर्गमित करुन सार्वजनिक मर्यादा आखून दिलेल्या आहेत. तसेच, नियमांचे उल्‍लंघन करणाऱयांवर भारतीय दंड विधान संहितेनुसार तसेच साथरोग व्यवस्थापन कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत मुंबई पोलीस प्रशासनाने १४ डिसेंबर २०२१ च्या आदेशांन्वये स्पष्ट केले आहे. या दोन्ही आदेशातील सूचनांचे योग्य ते पालन होणे आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

येत्या काही दिवसांमध्ये नाताळ तसेच नवीन वर्ष प्रारंभ पार्श्वभूमीवर समारंभ आणि सोहळ्यांचे आयोजन झाल्यास गर्दी होण्याचा धोका आहे. तसेच लग्न व इतर समारंभांच्या आयोजनातून वाढत असलेली गर्दी रोखणे गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर, हॉटेल्स आणि उपहारगृह व इतर सार्वजनिक आस्थापनांमध्ये देखील गांभीर्याने नियम पाळले जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे महापालिकेने काही सूचना केल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.