छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. बिग बॉस मराठीला सुरुवात होताच सदस्यांमध्ये होणारे राडे, भांडण, गॉसिप पाहायला मिळाले. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजशिर्के, किरण माने, अपूर्वा नेमळेकर, रुचिरा जाधव असे अनेक चर्चेतील कलाकार सहभागी झाले. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळाली.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिले एलिमिनेशन पार पडले. बिग बॉसच्या घरात येणाऱ्या प्रत्येक सदस्याला आपण तिकडे शेवटपर्यंत टिकून राहावे असे वाटत होते. मात्र ते प्रत्येकाला शक्य नसते. या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून दोन आठवडे कोणताही सदस्य बाहेर पडला नव्हता. त्यामुळे दोन आठवड्याच्या प्रवासानंतर कोणता सदस्य घराबाहेर जाणार याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता पाहायला मिळाली. अखेर तो क्षण आज आला. बिग बॉसच्या घरातील पहिले एलिमिनेशन कार्य नुकतंच पार पडले.
यात अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे पाच सदस्य डेंजर झोनमध्ये असल्याचे महेश मांजरेकरांनी जाहीर केले. यानंतर महेश मांजरेकरांनी यातील कोणता सदस्य घरात राहणार यांची नाव घेण्यास सुरुवात केली. यावेळी सुरुवातीला महेश मांजरेकरांनी अमृता धोंगडे हिने नाव सेफ झोनमध्ये असल्याचे जाहीर केले. त्या पाठोपाठ रोहित शिंदे, अमृता देशमुख या दोघांची नावे महेश मांजरेकरांनी जाहीर केली.
यानंतर शेवटी रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे दोघेही डेंजर झोनमध्ये होते. अखेर महेश मांजरेकरांनी निखिल राजेशिर्के हा या घरातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. यामुळे निखिलचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपला. ही घोषणा झाल्यानंतर घरातील सर्वजण भावूक झाले. यावेळी घरातील सदस्यांनी निखिलला भावूक होत मिठी मारली.
यानंतर मंचावर आल्यानंतर महेश मांजरेकरांनी निखिलचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच तो कुठे चुकला याबद्दल त्याचे कानही पिरगळले. ‘बाकी काहीही असू दे, घरातला हा बेस्ट माणूस होता’, अशा शब्दात महेश मांजरेकरांनी निखिलचे कौतुक केले.