जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल तिहेरी स्पर्धा प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटील, अर्जुन बाबुटा आणि किरण जाधव यांनी सुवर्ण कामगिरी केली. रुद्रांक्षचे स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. भारतीय त्रिकुटाने चीनचा १६-१० असा पराभव करून ही सोनेरी कामगिरी केली. रुद्रांक्षने जागतिक स्पर्धेत वरिष्ठ पातळीवरील हे दुसरे सुवर्णपदक मिळविले.
यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी त्याने याच स्पर्धा प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळविले होते. भारताने रविवारी १ रौप्य आणि २ कांस्यपदकेही मिळविली. स्पर्धेत भारताचे चीनपाठोपाठ दुसरे स्थान कायम असून, आतापर्यंत भारताने ५ सुवर्ण, १ रौप्य आणि पाच कांस्यपदके मिळविली आहेत. मन्वी जैन आणि समीर यांनी मिश्र दुहेरीत भारताला पहिले रौप्यपदक मिळवून दिले. पायल खत्री आणि साहिल दुधाने यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले.