देशात अलिकडच्या काळात पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. दहशतवादी अधूनमधून डोके वर काढीत आहेत. देशाचा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन एक दिवसावर आला असतानाच दहशतवादी कारवायांचीही भिती सतावत आहे. पाकिस्तानच्या सीमेवर दहशतवादी सक्रीय बनले असून त्यांच्याकडून घुसखोरी करून हल्ला घडवला जाण्याची भिती गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. याची बीएसएफ सह सर्वच सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतली आहे. हिंदुस्थानच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) जवळपास 104 ते 135 दहशतवादी दबा धरून बसले असून ते कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सीमा सुरक्षा बलचे (बीएसएफ) महानिरीक्षक राजा बाबू सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. या दहशतवाद्यांची घुसखोरी उधळून लावण्यासाठी बीएसएफ अॅलर्ट मोडवर आहे.
मागील वर्षी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारानंतर एलओसीवर शांतता आहे. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या नव्या इशार्यानुसार, जवळपास 104 ते 135 दहशतवादी कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून बसले आहेत. बीएसएफकडून त्या दहशतवाद्यांच्या हालचाली व इतर कारवायांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे महानिरीक्षक सिंह यांनी बीएसएफ मुख्यालयातील वार्षिक संमेलनात बोलताना सांगितले.
ठाण्यातील पोलीस स्कूलला रविवारी एक धमकीचा मेल आला आहे. जिहाद 2022 या मेलवरुन हा धमकीचा मेल आला होता. या मेलमध्ये शाळा, महाविद्यालये आणि रेल्वे स्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी या मेलमध्ये आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची झोप उडाली आहे. या मेलचा सायबर पोलीस सखोल तपास करीत आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पुढील 27 दिवस कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅरा ग्लायडिंग, पॅरा मोटर्स, हँग ग्लाईडर, मानवरहित एरियल वाहन हवेत उडविण्यावर बंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत दहशतवाद्यांकडून हवाई हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत.