तर मशिदीच्या समोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवणार : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी दंड थोपटले आहेत. राज यांनी आज शिवतिर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं आहे. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असं युरोपातील शासन आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार असल्याचं जाहीर केलं होतं. तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरे बोलणार असल्याने राज आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेनुसार राज ठाकरे यांची तोफ शिवतिर्थावरुन धडाडली.

यावेळी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत मशिदीवरील भोंग्यालाही विरोध केला. आमच्याकडे मंदिरं आहेत. टाका धाडी. काय मिळणार… घंटा. आमच्याकडे काहीच नाही. म्हणून मला जातीत खितपत पडलेला असा फरफटत जाणारा असला समाज नाही आवडत. असल्या लोकांचं नेतृत्व करायला आवडत नाही. मला आरे ला कारे करणारा समाज हवा. कोणत्याही सत्ताधाऱ्यांची हिंमत होता कामा नये तुमच्याशी गद्दारी करायची, असं राज ठाकरे म्हणाले.

पंतप्रधानांना विनंती आहे की, ईडीच्या धाडी टाकताना आधी झोपडपट्टीतील मदरश्यांवर धाडी टाका. पोलिसांकडे सर्व सोर्स आहेत. पाकिस्तानची गरज नाही. उद्या काही घडलं तर आवरता आवरता येणार नाही. पण आमचं लक्ष नाही. आपल्याला मते हवे आहेत. आम्ही झोपडपट्ट्या वाढवत आहोत. अनेक मशिदी आहेत. त्यात काय चाललंय हे समजत नाही. हे पाकिस्तानच्या प्रोत्साहानाने आलेले लोक आहेत. आमदार, नगरसेवक खासदारांना घेणं देणं नाही. आधार कार्ड आहे, रेशनकार्ड आहे हे घे आणि आमचीच मार. यांना या सर्व गोष्टी पुरवणारे आमचेच लोक. एकदिवस येईल सर्वांचे डोळे उघडेल हे काय करून ठेवलं. एकदा पोलिसांशी बोला. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. धडकी. पण आमचं लक्ष नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

1995 साली ज्या झोपडपट्ट्या होत्या. आताच्या झोपड्या बघा. फरक बघा. युतीची सत्ता आली. त्याआधी बाळासाहेबांशी बोललो होतो. मी म्हटलं काका झोपडपट्टीवासियांना फुकट घरं… फुकट ही गोष्ट चांगली नाही. मला म्हणाले, तू शांत बस. मुंबई भागातील लोकांना चांगली घरे होती. उद्देश चांगला होता. हेतू चांगला होता. पण मुंबईत फुकट घर मिळतं म्हटल्यावर लोंढेच्या लोंढे मुंबईत आले. ठाणे बकाल झालं. नाशिक बकाल झालं. अनेक झोपड्यात काय चाललं आहे, असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.