जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो, कोणत्याही संकटावर मात करू शकतो. 50 वर्षांपूर्वी अँडीज पर्वतरांगांमध्ये हेच घडलं होतं. उरुग्वेतल्या रग्बीपटूंनी चिलीच्या संघासोबत खेळण्यासाठी विमानातून प्रस्थान केलं खरं; पण विमान चिलीपर्यंत पोहोचलंच नाही. अँडीज पर्वतरांगांमध्ये ते कोसळलं. त्यानंतर प्रचंड बर्फाळ असलेल्या त्या पर्वतांमध्ये जिवंत राहण्यासाठी त्यांनी जे केलं, ते अतिशय थरारक होतं. 72 दिवसांच्या त्या जगण्याच्या लढाईमध्ये अखेर 16 जण सुखरूप बचावले. या भयानक अपघाताला 50 वर्षं पूर्ण झाली आहेत.
आजवर अनेक विमान अपघात घडले आहेत; मात्र पन्नास वर्षांपूर्वी अँडीज पर्वतरांगांमध्ये जो विमान अपघात झाला, तो हादरवणारा होता. त्या अपघातापेक्षाही जिवंत राहिलेल्या प्रवाशांची जगण्यासाठीची पराकाष्ठा मन हेलावणारी होती. अपघात झाल्यानंतर तब्बल 72 दिवसांनंतर काही प्रवासी सुखरूप सापडले. 13 ऑक्टोबर 1972 रोजी चिलीमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेत खेळण्यासाठी उरुग्वेचा रग्बीचा संघ जाणार होता. ओल्ड ख्रिश्चन टीमसोबत त्यांची स्पर्धा होती. त्यासाठी 12 ऑक्टोबरला उरुग्वेचे 9 खेळाडू, मॅनेजर, त्यांचे मालक आणि काही मित्रमंडळी यांच्यासह विमान रवाना झालं. उरुग्वेच्या वायुदलाच्या या विमानात 5 क्रू मेंबर्स होते. विमान निघाल्यानंतर काहीच वेळात खराब हवामानामुळे ते अर्जेंटिनामध्ये उतरवावं लागलं.
हवामान चांगलं होण्याची वाट पाहण्यासाठी सर्व जण दुसऱ्या दिवशीपर्यंत तिथेच थांबले. विमानानं 2 वाजून 18 मिनिटांनी अर्जेंटिनातून उड्डाण केलं. एका हिमशिखरावरून विमान जात होतं. वास्तविक वैमानिक त्या मार्गानं 29 वेळा गेला होता; मात्र त्या वेळी ते विमान सहवैमानिकाच्या हातात होतं. हवामान प्रचंड खराब होतं. एक वादळ पार करून विमान पुढे गेलं. चिलीतल्या सँतियागो एटीसीशी संपर्क साधून वैमानिकानं विमान उतरवण्याची परवानगी मागितली; पण सँतियागो एटीसीला रडारवर हे विमानच दिसत नव्हतं. त्याचदरम्यान सहवैमानिकानं विमान थोडं खाली घेतलं आणि ती दुर्घटना घडली. हिमशिखरावर आदळून विमानाचा मागचा भाग तुटून खाली पडला. त्यात 2 क्रू मेंबर व 3 प्रवासी होते. त्यानंतर विमान पर्वतावर आदळून 200 मीटरपर्यंत घासत खाली गेलं. त्या वेळी उरलेल्या विमानाचे 2 तुकडे झाले. उरुग्वेतून निघताना विमानात 45 प्रवासी होते. त्यापैकी 5 खाली पडल्यामुळे 40 जण विमान खाली घसरलं तेव्हा त्यात होते. त्यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला व सहवैमानिक अडकला होता. विमानातल्या 12 जणांचा यात मृत्यू झाला. 35 जण जिवंत होते; मात्र त्यातल्या आणखी 5 जणांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.
रडारवरून विमान गायब झाल्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. दुसऱ्याच दिवशी 4 विमानांनी शोधमोहीम सुरू केली. दुसऱ्या दिवशी 3 देशांची 11 विमानं शोधमोहिमेसाठी रवाना झाली; मात्र कोणालाच यश आलं नाही. ही विमानं जिवंत प्रवाशांनी पाहिलं होतं; पण बर्फ असल्यामुळे विमानं खूप उंचावरून उडत होती. त्यामुळे वैमानिक त्यांना पाहू शकले नाहीत. असं 3 वेळा घडलं आणि विमानं तशीच परत आली. इतका बर्फ, हिमवादळं असल्यामुळे तिथे कोणीही जिवंत राहू शकत नाही, असं समजून अखेर 8 दिवसांनी शोधमोहीम बंद करण्यात आली. उन्हाळ्यात मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला.
अपघाताच्या ठिकाणी मात्र जिवंत प्रवाशांची उणे तापमानाच्या थंडीपासून संरक्षणासाठीची धडपड सुरू होती. तुटलेल्या विमानाला जोडून त्याच्या आत ऊब मिळवायचा प्रयत्न त्यांनी केला. वैद्यकीय शिक्षण घेणारे 2 विद्यार्थी विमानात होते. त्यांच्या जवळ असलेल्या साहित्यातून त्यांनी जखमींवर उपचार करायला सुरुवात केली. अपघातानंतर नवव्या दिवशी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. अंतर जास्त नसल्यानं विमानात खाण्याचं फारसं सामान नव्हतं. चॉकलेटचे 8 डबे, जॅमच्या 3 बाटल्या, खजूर, सुकामेवा, कँडीज आणि वाइनच्या अनेक बाटल्या होत्या. पाणीही संपलं होतं. विमानात आता 27 प्रवासी जिवंत होते. त्यांनी खाण्याचे जिन्नस सर्वांमध्ये समान वाटले. बर्फ वितळवून पाणी तयार करण्याचा प्रयत्न केला. एका प्रवाशानं 11 व्या दिवशी विमानात सापडलेला रेडिओ दुरुस्त केला; मात्र त्यावर संदेश येऊ शकत होते, जाऊ शकत नव्हते. सरकारनं शोधमोहीम थांबवल्याचं त्यामुळे त्याला कळताच त्यानं चांगली बातमी म्हणून इतरांना सांगितली. आता आपल्या मदतीला कोणीही येणार नाही. आता आपल्यालाच आपली मदत करावी लागणार आहे, हे सत्य त्या प्रवाशानं सर्वांना सांगितलं.
काहीच दिवसांमध्ये त्यांच्याकडचे पदार्थ संपले. काहींनी विमानाची सीट कव्हर्स फाडून खाल्ली; मात्र त्यातून ते आजारी पडले. काही दगावलेही. 29 ऑक्टोबरला त्या पर्वतांमध्ये एक हिमवादळ आलं. त्यात त्यांचा आसरा असलेला विमानाचा भाग तुटला. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला. सगळीकडे केवळ बर्फाळ प्रदेश दिसत असताना उरलेल्या 19 जणांचा जगण्याचा संघर्ष अजून सुरुच होता. तापमान उणे अंशांमध्ये असल्यानं तिथे मृतदेह टिकून राहिले होते. आता जगण्यासाठी मृत व्यक्तींचं मांस खाण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय राहिला नव्हता. आपल्या सहकाऱ्यांचं मांस खाण्याचा विचारही कोणी करू शकत नव्हतं; पण अखेर विमानातल्या तुटलेल्या काचेनं शरीर फाडून त्यातलं मांस त्यांनी पहिल्यांदा खाल्लं. अपघातानंतरच्या 34 व्या दिवशी व 37 व्या दिवशी दोघांचा मृत्यू झाला. अपघाताला 60 दिवस झाल्यावरही एक जण दगावला. त्यामुळे एकूण 16 प्रवासी जिवंत राहिले. दोन महिन्यांनंतर त्यांचं वजन निम्मं झालं होतं. आता तिथे राहून नुसतं मरणाची वाट पाहण्यापेक्षा मदतीसाठी पर्वत पार करण्याचा विचार त्यांनी केला. त्यांच्यापैकी 3 जण हा प्रवास करण्यासाठी तयार झाले. कपडे ओले होऊ नयेत, यासाठी त्यांनी विमानाची सीट कव्हर्स व इतर सामानापासून ड्रेस तयार केले. मृत प्रवाशांचे कपडे काढून तेही त्यांनी घातले. तीन दिवसांनंतर त्यांच्याकडचं मांस संपायला लागल्यामुळे त्यांनी तिसऱ्या व्यक्तीला परत पाठवण्याचा निर्णय घेतला. पर्वत चढण्यासाठी 3 दिवस लागले असताना तो प्रवासी पर्वत उतरून एका तासातच इतरांपाशी पोहोचला.
मदत मिळवण्यासाठी निघालेल्या दोघांनी तब्बल 8 दिवस बर्फातून प्रवास करत अखेर मदत मिळवली. त्यांना एक हिरवा डोंगर दिसला. दहाव्या दिवशी 21 डिसेंबरला ते त्या डोंगरावर पोचले. चालत चालत ते एका नदीकिनाऱ्यापाशी पोहोचले; मात्र पलीकडे उभ्या असलेल्या तिघांशी ते बोलू शकत नव्हते. त्यांच्या अंगात बोलण्याची शक्ती नव्हती. तसंच नदीच्या प्रवाहामुळे त्यांचा आवाज पोहचत नव्हता. पलीकडच्या व्यक्तीनं पेन्सिल व कागद एका दगडाला बांधून त्यांच्यापर्यंत फेकला. त्यामुळे त्यांचा संवाद शक्य झाला. त्या वेळी त्यांनी विमान अपघात व मदतीबाबत सांगितलं. पलीकडच्या व्यक्तींनी दुसऱ्या दिवशी मदत मिळेल असं त्यांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी पोलिसांना ही बातमी समजल्यामुळे त्या दोन प्रवाशांना मदत मिळाली. त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या दोघांना घेऊन 3 हेलिकॉप्टर्स घटनास्थळी पोहोचली खरी; मात्र तिथे एकच उतरू शकत होतं. त्यामुळे पहिल्यांदा 7 गंभीर जखमींना घेऊन ते हेलिकॉप्टर आलं. खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशी उरलेल्यांना वाचवण्यात आलं.
तब्बल 72 दिवसांचा जिवंत राहण्याचा अनुभव सर्वच प्रवाशांनी नंतर सांगितला. मृत व्यक्तीचं मांस खाल्ल्याबद्दल अनेकांनी त्यांची हेटाळणीही केली. अशा घटना खूपच दुर्मीळ असतात. इतक्या बर्फाळ प्रदेशात उणे तापमानात जगण्याची इच्छा असेल, तर काय करता येऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण त्या प्रवाशांनी दाखवून दिलं.