अल्पवयीन मुलाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. धारदार कोयत्याने हल्ला करत मध्यरात्रीची मुलाने आईची हत्या केली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे भागात मध्यरात्री हत्येचा थरार घडला. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या सावत्र आईची हत्या केली. मुलाने धारदार कोयत्याने महिलेवर हल्ला केला होता. रेखा वाघमारे असं मयत सावत्र आईचे नाव आहे.
17 वर्षांचा मुलगा काहीही काम करत नाही, नुसता फिरत असतो, अशी तक्रार सावत्र आई रेखा वाघमारे सतत आपल्या पतीकडे करत असायच्या. या कारणावरुन झालेल्या वादानंतर मुलाने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्ये प्रकरणी अल्पवयीन मुलाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या आईची 19 वर्षीय तरुणाने हत्या केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी पुण्यातच समोर आला होता. हत्येसाठी तरुणाच्या 26 वर्षीय प्रेयसीनेही त्याला साथ दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर पोलिसांनी प्रेमी युगुलाला बेड्या ठोकल्या. मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, आईचा खून करणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच फाशीची शिक्षा सुनावली आहे. 28 ऑगस्ट 2017 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. दारुसाठी पैसे न दिल्याने सुनील कुचकोरवी (Sunil Kuchkorvi) याने आईची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नराधम मुलाला बेड्या ठोकल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे.