या 5 गोष्टींनी केलं गुजरातला चॅम्पियन, कोणालाच कळला नाही हार्दिक-नेहराचा गेम प्लान!

आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. याचसोबत आयपीएलला नवी चॅम्पियन टीम मिळाली आहे. आपली पहिलीच आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सना ही सर्वोत्तम कामगिरी करण्यात यश आलं आहे. खेळाडूंचा लिलाव झाल्यानंतर आणि स्पर्धेच्या सुरूवातीला कुणीच गुजरात टायटन्सना आयपीएल जिंकण्यासाठी दावेदार धरलं नव्हतं, मग गुजरातने असं काय केलं, ज्यामुळे त्यांना ट्रॉफी जिंकण्यात यश आलं, यावर एक नजर टाकूयात.

हार्दिकची कॅप्टन्सी

गुजरात टायटन्सनी हार्दिक पांड्याला लिलावाआधी विकत घेऊन कर्णधार केलं, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं, कारण त्याच्या फिटनेसचा प्रश्न होता. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर हार्दिक टीम इंडियाबाहेर गेला, तसंच तो त्यानंतर क्रिकेटही खेळत नव्हता, पण आयपीएलमध्ये हार्दिक पूर्णपणे फिट होऊन आला. रोहित शर्माकडून कॅप्टन्सीचे गूण शिकलेल्या हार्दिकने तीच रणनिती गुजरातच्या टीममध्ये राबवली. आर.साई किशोर, यश दयाळ यांच्यासारख्या युवा खेळाडूंवर त्याने विश्वास दाखवला.

गुजरातचा ओपनर शुभमन गिल चांगल्या सुरूवातीनंतर आयपीएलच्या मधल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत होता, पण तरीही हार्दिक त्याच्या रणनितीवर ठाम राहिला, याचा फायदा त्यांना झाला आणि लीग स्टेजनंतर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर राहिली.

आशिष नेहराचा मैदानाबाहेरचा गेम प्लान

आयपीएल 2022 मध्ये जवळपास सगळेच कोच लॅपटॉप आणि तंत्रज्ञानाचा वापर करत होते, पण आशिष नेहरा याला अपवाद ठरला. लिलावामध्येही नेहरा ऑक्शन टेबलवर बसून बोली लावत होता. नेहराने ऑक्शन टेबलवर आणि आयपीएलदरम्यान मैदानाबाहेरही रणनिती साधी आणि सरळ ठेवली.

फिनिशरनी फिनीश केले सामने

डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया आणि राशिद खान या फिनिशरनी गुजरात टायटन्सना अनेक रोमांचक विजय मिळवून दिले. गुजरातने या मोसमात 9 सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग केला, यातल्या 8 मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेल्या आणि 7 मॅचमध्ये गुजरातचा विजय झाला.

युवा-अनुभवी खेळाडूंचं मिश्रण

गुजरात टायटन्सकडे या मोसमात युवा आणि अनुभवी खेळाडूंचं मिश्रण होतं. साई किशोर, अभिनव मनोहर, यश दयाळ, दर्शन नालकंडे, या नवख्या खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं केलं, याशिवाय हार्दिक, राशिद, गिल, मिलर, शमी आणि तेवातिया या आयपीएलचा अनुभव असलेल्या खेळाडूंनीही एकहाती मॅच जिंकवून दिल्या.

लिलावातल्या ट्रोलिंगला मैदानात उत्तर

आयपीएल 2022 साठी झालेल्या लिलावानंतर गुजरातच्या टीमचं मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग करण्यात आलं, पण त्यांनी या सगळ्याचं मैदानात उत्तर दिलं. लिलावामध्ये गुजरातने सुरूवातीला विकेट कीपरलाच विकत घेतलं नव्हतं, अखेरच्या तासामध्ये गुजरातने ऋद्धीमान साहा आणि मॅथ्यू वेडवर बोली लावली. ऋद्धीमान साहाने या मोसमात धमाका केला. साहाने 11 सामन्यांमध्ये 31.70 च्या सरासरीने आणि 122.39 च्या स्ट्राईक रेटने 317 रन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.