मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राजकारण चांगलंच तापलंय. केतकी चितळेने केलेल्या या आक्षेपार्ह पोस्टीचा विविध स्तरातून निषेध केला जात आहे. मनसेप्रमुखे राज ठाकरे यांनीही पत्रक काढत या वृत्तीचा निषेध केला. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चांगलाच समाचार घेतला आहे.
“येताना बातमी पाहिली. कोणी तरी बाई आहे. तिने पवारांवर विचित्र कमेंट केली. काय घरी आईवडील आजी आजोबा आहे की नाही. संस्कार होतात की नाही”, असा शब्दात ठाकरे यांनी केतकीचा समाचार घेतला. मुख्यमंत्री मुंबईतील बीकेसीतील जाहीर सभेत बोलत होते.
“किती काही झांल तर बाई तुझा संबंध काय कुणावर बोलतेस काय बोलतेस हे तुझं वक्तव्य असेल तर तुझ्या मुलांचं काय होणार”, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
“हा सुसंस्कृतपणा आहे तो आपल्या देशातून राज्यातून जात आहे. ते जपायचं आहे. ते खरं हिंदुत्व आहे”, असंही शिवसेना पक्षप्रमुख यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राज्यात विविध ठिकाणी केतकी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस केतकीला कंळबोली ठाण्यातून नेत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केतकीवर शाई आणि अंडी फेकली. दरम्यान आता केतकीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.