दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) सर्वात वादग्रस्त शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. जेएनयू सतत काहीनाकाही कारणामुळे चर्चेत असतं. गेल्या महिन्यात (डिसेंबर 2022) जेएनयू कॅम्पसमधील अनेक भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिल्याचं निदर्शनास आलं होतं. आता पुन्हा एकदा जेएनयू चर्चेत आलं आहे. (19 डिसेंबर) संध्याकाळी जेएनयू कॅम्पसमध्ये सर्वत्र भयावह स्थिती निर्माण करण्यात आली होती. ‘द कश्मीर फाइल’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान सर्वत्र मृतदेहांच्या डमी ठेवण्यात आल्या होत्या. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं ते भारत सरकार आणि जनतेनं विसरू नये, यासाठी असा देखावा तयार करून चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
काश्मिरी पंडितांच्या काही संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (भाविप) संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजकांपैकी एक असलेल्या ‘युथ फॉर पनून काश्मीर’ या संघटनेचा सदस्य दिगंबर रैनानं सांगितलं की, 1990 मध्ये काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून बाहेर काढण्यात आलं तेव्हा दिगंबर 14 वर्षांचा होता. त्यावेळी काय घडलं होते, ही गोष्ट चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं होतं. आजपर्यंत त्याबाबत ना एफआयआर दाखल झाला आहे ना कोणतीही चौकशी झाली आहे.
जेएनयू एबीव्हीपी युनिटचा अध्यक्ष रोहितनं दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या कॅम्पसमधील स्क्रीनिंगसाठी 400 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. जेएनयू एबीव्हीपीचा सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाला की, एक काळ असा होता की जेएनयू कॅम्पसमध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा दिल्या जात होत्या. हा चित्रपट दाखवून आम्ही अशा विचारधारांचा पर्दाफाश करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. काश्मीरमध्ये हिंदूंची कशी हत्या झाली, याबाबत पॅनल डिस्कशनही झालं. या वेळी पीडित कुटुंबीयांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.