ब्रिटन पंतप्रधानपद उमेदवारीची ऋषी सुनक यांच्याकडून घोषणा

ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी रविवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली. ही घोषणा करताना त्यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले. यासाठी १०० पार्लमेंट सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. ४२ वर्षीय सुनक यांना सत्ताधारी काँझरव्हेटिव्ह पक्षाच्या १२८ पार्लमेट सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या पदासाठीच्या पक्षांतर्गत स्पर्धेत त्यांचे पारडे सध्या जड दिसत आहे.

दुसरीकडे, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या समर्थकांचा दावा आहे, की जॉन्सन यांना काँझव्र्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याच्या शर्यतीत आवश्यक असलेल्या १०० खासदारांचा पािठबा आहे. जॉन्सन यांनी अधिकृतपणे आपली उमेदवारी जाहीर केली नसली, तरी काँझव्र्हेटिव्ह पक्षाचे नेतेपद व पंतप्रधानपदाची पक्षांतर्गत निवडणूक सुनक, जॉन्सन व पेनी मॉर्डाट यांच्यात तिहेरी सामना होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

उमेदवारीची घोषणा करताना सुनक यांनी ‘ट्वीट’ केले, की ब्रिटन हा एक महान देश आहे. आपल्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. म्हणूनच मी काँझव्र्हेटिव्ह पक्षनेतृत्व व पंतप्रधानपदासाठी रिंगणात उतरत आहे. मला अर्थव्यवस्था नीट करायची आहे. पक्षाची एकजूट करून देशासाठी काम करायचे आहे. आमच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. परंतु आपण योग्य निवड केल्यास संधीही विलक्षण आहेत. माझ्याकडे पूर्वानुभव आहे. आपल्यासमोरील सर्वात मोठय़ा समस्यांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी माझ्याकडे स्पष्ट योजना आहे. मी २०१९ च्या आश्वासनांचे पालन करीन.

ब्रेव्हरमन यांचा पाठिंबा
माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी ऋषी सुनक यांना पाठिंबा जाहीर केला. ‘हुजूर पक्षामध्ये एकता, स्थैर्य आणि कार्यक्षमतेसाठी’ पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. पक्षातल्या अतिउजव्या गटातून सुनक यांना पाठिंबा मिळणे हा माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना धक्का मानला जात आहे. त्यांनी अद्याप उमेदवारी जाहीर केली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी १०० सदस्यांचा आवश्यक पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.