आज आषाढ मासारंभ होत आहे़. हा महिना जसा शेतकऱ्यांच्या, अध्यात्मिक भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसाच तो साहित्य विश्वाच्याही दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे़ आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आजची तिथी ही महाकवी कालिदास जयंती अलिकडे आज ‘संस्कृत दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली ‘मेघदूतम’ ही कवी कालिदासांची साहित्यकृती अजरामर ठरली.
मेघदूत म्हणजे मातीच्या आर्त प्रेमाची हाक
कालिदास हा प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होता. मेघदूत, रघुवंशम्, कुमारसंभवम् आदी संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून तो सुपरिचित आहे. सुमारे चौथे शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राज्याच्या कालखंडात तो होऊन गेला असावा, असे मानले जाते. विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्नीमित्रम्, आणि अभिज्ञान शाकुंतलम ही त्याने लिहिलेली संस्कृत नाटकेही प्रसिद्ध आहेत. ही तिथी कालिदासाच्या स्मरणाने आणि त्याच्या कीर्तीतेजाने उजळून निघते.
कालिदास हा कालीचा भक्त आणि ब्राह्मणाचा मुलगा होता. तो जात्याच सुदृढ, सुस्वरूप आणि बुद्धीमान होता. त्याचे आई-वडील लहानपणीच मरण पावल्यामुळे त्याचा सांभाळ, पालणपोषण एका गवळ्याने केले. पण त्यामुळे त्याच्यावर विद्या, शिक्षणाचे संस्कार झाले नाहीत. जवळच्या एका नगरातील राजकन्येचे लग्न तेथील प्रधानाने कपट करून या देखण्या पण विद्याविहीन मुलाशी लावून दिले. पण तो अशिक्षित असल्याचे पाहून राजकन्येने त्याची निर्भत्सना केली. तेव्हा तो कालीच्या देवळात जाऊन उपासना करू लागला. कालीमाता प्रसन्न झाल्यावर त्याला कालिदास नाव आणि कवित्व व विद्वत्व प्राप्त झाले. तो परत राजदरबारी आल्यावर राजकन्येने त्याला विचारले, ‘अस्ति कश्चिद्वाग्विशेष’ (तुझ्या वाणीत आणि वागण्यात काही विशेष आहे का) त्यासरशी त्याने ‘अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा या आरंभाचे “कुंभारसंभव’ कश्चित्कान्ताविरह गुरुणा या आरंभाचे “मेघदूत’ आणि वागर्थाविव संपृक्तौ आरंभीचे “रघुवंश’ अशी तीन काव्ये उतरादाखल धडाधडा म्हणून दाखविली. यामुळे राजकन्या खुश होऊन त्याच्यावर अधिक प्रेम करू लागली. पण तो मात्र ज्ञानी झाल्याने आपल्या पत्नीशी मातृभावनेने वागू लागला. त्यामुळे चिडून जाऊन तिने त्याला शाप दिला की, एका स्त्रीच्या हातूनच तुला मृत्यू येईल. यानंतर मात्र कालिदास स्वैरपणे वागू लागला. एकदा कुमारदास नावाच्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी तो सिंहलद्वीपात गेला असता तिथल्या एका गणिकेकडून त्याला समजले की, “कमले कमलोत्पति: श्रूयते न तु दृश्यते’ म्हणजे एका कमळावर दुसऱ्या कमळाची उत्पत्ती होते असे ऐकले आहे, पण कधी पाहिले नाही या श्लोकार्थाची पूर्ती करणाऱ्याला राजाने मोठे बक्षीस जाहीर केले आहे. तेव्हा कालिदासाने तेथेच ‘तव मुख्याम्भोजात कथमिन्दीवर द्वयम्म्हणजे तुझ्या मुखकलावर दोन नेत्ररुपी निळी कमळे दिसतात, हे कसे’ हा श्लोकार्थ रचून ती समस्यापूर्ती केली. ते ऐकून ती गणिका आश्चर्यचकित झाली. पण समस्यापूर्तीचे बक्षीस कालिदासाऐवजी आपणास मिळावे, म्हणून तिने त्याचा वध करविला. अशी आख्यायिका प्रसिध्द आहे.
संजीव वेलणकर, पुणे