लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) 75 धावांच्या फरकाने धमाकेदार विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने गुजरातला पछाडत पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. लखनऊ 16 पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
लखनऊने कोलकाताला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या कोलकाताला लखनऊच्या गोलंदाजांनी 14.3 ओव्हरमध्ये 101 धावांवरच ऑलआऊट केलं.
कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 45 धावा केल्या. सुनील नरेनने 22 रन्स केल्या. तर एरॉन फिंच 14 धावांवर बाद झाला. या तिघांचा अपवाद वगळता लखनऊच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठू दिला नाही.
लखनऊच्या सर्व गोलंदाजांनी शानदार बॉलिंग केली. लखनऊकडून आवेश खान आणि जेसन होल्डर या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहसिन खान, दुष्मंथ चमिरा आणि रवी बिश्नोई या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेत आवेश आणि होल्डरला चांगली साथ दिली.
त्याआधी केकेआरने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनऊने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 रन्स केल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉकने अर्धशतकी खेळी केली. दीपक हुड्डाने 41 रन्स काढल्या. मार्क्स स्टोयनिसने 28 तर कृणाल पंड्याने 25 रन्स केल्या. तर कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.