कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी, दरड कोसळल्याने वाहने अडकली

राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या बहुतेक भागात काल रात्रीपासून संततधार ते जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. तिकडे औरंगाबादेत पाझर तलाव फुटला आहे. तर जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसाने नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत. तर औरंगाबादेतही तुफान पावसाने नद्यांना पूर आला आहे.

तीतूर डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील कोदगाव आणि वलथाण ही धरणं भरली असून जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला आहे. अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली. अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही पुलावरुन मोठया प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चाळीसगाव शहरातून औरंगाबादकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.

चाळीसगावातील पीर मुसा कादरी दर्गा, शिवाजी घाट परिसरातील अनेक दुकाने वाहून गेली. तर सदर बाजार, देवळीवाडा आणि भीमनगर भागातील भिल्ल वस्तीत अनेक घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. अनेक कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत. तर अचानक आलेल्या पुरामुळे काही जण वाहून गेल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.

औरंगाबादमध्येही जोरदार पाऊस बरसत आहे. भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी काढले बाहेर. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार समोर आला.

जळगावातील चाळीसगाव आणि औरंगाबादेतील कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला. तर कन्नड चाळीसगाव घाटात कोसळली दरड. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर. कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा तुटला संपर्क

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.